सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे अयोध्येला जाणार नाहीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेस पक्ष सहभागी होणार नाही. हा आरएसएसचा कार्यक्रम असल्याचे सांगत काँग्रेसने त्यात सहभागी होण्यास नकार दिला. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभा खासदार अधीर रंजन चौधरी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बुधवारी दिली. पक्षाध्यक्ष खर्गे आणि अधीर रंजन चौधरी यांनी याला दुजोरा दिला. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सर्व पक्षाध्यक्षांना पाठवण्यात आले होते.
गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येतील सोहळ्याचे निमंत्रण मिळाले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत भाजप आणि आरएसएसने अयोध्येतील राम मंदिराला राजकीय प्रकल्प बनवले असल्यामुळे या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते सहभागी होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी अर्ध-निर्मित मंदिराचे उद्घाटन केले जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
22 जानेवारीला दुपारी नव्याने बांधलेल्या मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या दिवशी देशभरातून अध्यात्म, चित्रपट, क्रीडा, विज्ञान आणि राजकारणाशी संबंधित लोक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याआधी पवित्र अयोध्यानगरी भव्य आणि दिव्य बनवली जात आहे. मुख्य सोहळ्यानंतर 23 जानेवारीपासून अयोध्येतील मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे.









