माजी मंत्री केपीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष विनयकुमार सोरके यांची माहिती : 22 ऑगस्ट रोजी सभा घेणार
बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने काँग्रेस पक्ष आणि सरकारतर्फे बेळगावात गांधी भारत कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे आता जिल्हा, तालुका, ग्राम पंचायत व बुथ पातळीवर कार्यक्रम आयोजित करून काँग्रेस पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी 22 ऑगस्ट रोजी सभा घेण्यात येणार असून त्यानंतर प्रचार समितीच्या माध्यमातून कार्यक्रम हाती घेतले जातील, अशी माहिती माजी मंत्री व कर्नाटक प्रदेश काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष विनयकुमार सोरके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवारी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बेळगाव दौऱ्यावर आलेले माजी मंत्री विनयकुमार सोरके पत्रकारांशी बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे युवानेते मृणाल हेब्बाळकर यांच्यासह इतर उपस्थित होते. केपीसीसी प्रचार समिती अध्यक्ष सोरके म्हणाले, काँग्रेस पक्षातर्फे गांधी भारत, त्याचबरोबर ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ कार्यक्रमाचे आयोजन बेळगावात काँग्रेस पक्ष व सरकारतर्फे करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम वर्षभर राबविण्यासाठी मंत्री एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. यापुढे हे कार्यक्रम जिल्हा, तालुका, ग्राम पंचायत व बुथ पातळीवर पोहोचविले जाणार आहेत. यासाठी प्रचार समित्यांची स्थापना केली जाणार आहे. भाजपकडून मतचोरी केली जात असल्याने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. कर्नाटक, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मतचोरीचे प्रकार वाढले असून मतदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये हे प्रकार घडले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी मतचोरीचा पर्दाफाश केला आहे. 22 रोजी पार पडणाऱ्या सभेनंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रचार समिती कामाला लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.









