वृत्तसंस्था/ लखनौ
काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात आभार यात्रा काढणार आहे. यामध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश असेल. 11 जून ते 15 जून या कालावधीत राज्यातील सर्व 403 विधानसभांमध्ये ही यात्रा काढण्यात येणार आहे. यादरम्यान प्रत्येक वर्गातील लोकांना संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी दोन टप्प्यात काँग्रेसची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न केले होते. उत्तर प्रदेश सोबतच अन्य राज्यांमध्येही ‘भारत जोडो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. परिणामत: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.









