युवक काँग्रेसचे पदाधिकारी भाजपात जाण्याच्या तयारीत
विशेष प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसच्या बडय़ा नेत्यानंतर आता युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार युवक काँग्रेससाठी आजही आयकॉन असलेले संकल्प आमोणकर हे भाजपमध्ये गेल्याने आणि गिरीश चोडणकर हे प्रदेशाध्यक्षपदापासून दूर गेल्याने युवा काँग्रेसच्या कित्येक कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल चालू आहे. त्यातच अलिकडे झालेल्या गुप्त बैठकीत युवक काँग्रेसचे काही पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्धार व्यक्त केला.
सध्या भाजपकडे युवा शक्ती काही कमी नाही. परंतु काँग्रेसमधून मोठय़ा प्रमाणात पक्षात येणारी फौज लक्षात घेता भाजप युवा मोर्चा अस्वस्थ झालेला आहे. त्यांची कामे त्यामुळे थकलेली आहेत. नेहमीच सक्रिय असणारी भाजप युवा शक्ती सध्या थंडावलेली असल्याने काँग्रेसकडे असलेली मोठय़ा प्रमाणातली युवा शक्ती भाजपकडे वळण्याची शक्यता आहे. केवळ पितृपंधरवडा झाल्यानंतर काँग्रेसची अनेक दिग्गज युवा मंडळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.









