मेघालयच्या राजधानीत प्रचारसभा
वृत्तसंस्था/ शिलाँग
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी मेघालयाची राजधानी शिलाँगमध्ये प्रचारसभेला संबोधित केले आहे. यादरम्यान त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षाला देशाने नाकारले असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी ‘मेघालय मांगे, भाजप सरकार’ असा नवा नाराही दिला आहे.
मेघालयचा विषय आल्यावर येथील प्रतिभावंत लोक, जिवंत परंपरा आठवतात. अद्भूत नैसर्गिक सौंदर्य डोळय़ासमोर येते. मेघालयातील संगीत अन् फुटबॉल प्रेम अद्वितीय आहे. मेघालयाच्या कानाकोपऱयात सृजनशीलता असल्याचे उद्गार मोदींनी सभेत बोलताना काढले आहेत.
देशानेच नाकारलेले लोक नैराश्याच्या गर्तेत बुडाले आहेत. सध्या ते ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ असे म्हणत आहेत, परंतु देशाचा कानाकोपरा ‘मोदी तेरा कमल खिलेगा’ असे म्हणत आहे. भारत आता यशाच्या नव्या उंची गाठत असून मेघालयत यात स्वतःचे मजबूत योगदान देत आहे. आम्ही हे यश आणखी पुळे नेत राज्यासाठी काम करू इच्छितो. मेघालय आणि ईशान्येतील जनता भाजपसोबत असल्याचे सांगताना मला आनंद होत असल्याचे मोदी म्हणाले.
मेघालयाला ‘कुटुंब प्रथम’ऐवजी ‘लोक प्रथम’ असे म्हणणाऱया सरकारची गरज आहे. मेघालयाला घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्ती मिळायला हवी. दिल्लीच नव्हे तर मेघालयातही घराणेशाहीयुक्त पक्षांनी स्वतःची तिजोरी भरण्यासाठी मेघालयाला एटीएममध्ये रुपांतरित केले असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
मेघालयाच्या हितांना कधीच प्राधान्य देण्यात आले नाही. छोटय़ा-छोटय़ा मुद्दय़ांवरून लोकांमध्ये फूट पाडली गेली. या राजकारणाने येथील जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. येथील तरुण-तरुणींना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मेघालय आता फॅमिली फर्स्ट ऐवजी पीपल फर्स्ट या तत्वाचे सरकार इच्छित आहे. याचमुळे ‘कमळ’ मेघालयाची मजबूती, शांतता आणि स्थैर्याचा पर्याय ठरले असल्याचे मोदी म्हणाले.
शिलाँगमध्ये रोड
प्रचारसभेपूर्वी पंतप्रधान मोदींनी शिलाँगमध्ये एक रोड शो देखील केला आहे. यादरम्यान मोदींना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. या रोड शोच्या छायाचित्रांनी देशाच्या कानाकोपऱयात संदेश पोहोचविला आहे. मेघालयात चहुबाजूला भाजपच भाजप दिसून येत आहे. पर्वतीय असो किंवा मैदानी भाग, गाव तसेच शहरांमध्येही कमळ फुलताना दिसून येत असल्याचा दावा मोदींनी केला आहे.









