अ. भा. काँग्रेस सचिव पळनीयप्पन्न यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र सरकारचे जनता विरोधी धोरण, नित्योपयोगी वस्तूंच्या दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे दि. 28 एप्रिल रोजी सीपीएड् मैदानावर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव गोपीनाथ पळनीयप्पन्न यांनी दिली. येथील जिल्हा काँग्रेस भवनात शनिवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्र सरकारचे अपयश, नित्योपयोगी वस्तूंची दरवाढ याबद्दल देशवासियांना माहिती करून देणे गरजेचे आहे. यासाठीच आंदोलन हाती घेण्यात आले आहे. सत्तारूढ सरकारवर टीका करण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाला नाही. गॅरंटी योजनांमुळे राज्यातील जनतेला आर्थिक लाभ झाला आहे. गरीब, मध्यमवर्गातील महिलांना गॅरंटी योजनांचा चांगला लाभ होतो आहे. केंद्र सरकार भाववाढ करीत असेल तर काँग्रेस सरकारने गॅरंटी योजनांद्वारे जनतेचा आर्थिक भार कमी केला आहे. सोमवार दि. 28 रोजी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन होत असून याद्वारे देशातील जनतेपर्यंत चांगला संदेश पोहोचणार आहे. भाववाढीविरोधात बेंगळूर येथे आंदोलन नुकतेच यशस्वी करण्यात आले असून आता बेळगावात आंदोलन होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महागाई, केंद्राची अपयशी कामगिरी लपविण्यासाठी भाजपवाले जनाक्रोश नावाने आंदोलन करीत आहेत. राज्यातील सत्ताऊढ काँग्रेसबद्दल खोटी माहिती देऊन आपल्या चुकांवर पांघऊण घालण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप पळनीयप्पन यांनी केला.
केंद्राची अपयशी कामगिरी, महागाई, संविधान बचाव हे मुद्दे समोर ठेवून आंदोलन करण्यात येत असून यामध्ये अ. भा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांसह देश आणि राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने आंदोलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राजू सेठ, विनय नावलगट्टी, सुनील हनमण्णवर, प्रदेश काँग्रेसचे सचिव सदानंद ढंगन्नवर आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते









