देशविरोधी दुष्प्रचाराला चीनचे अर्थसहाय्य प्राप्त असल्याचा आरोप
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेत सोमवारी मीडिया पोर्टल ‘न्यूज क्लिक’चा मुद्दा उपस्थित झाला आहे. न्यूज क्लिकला चीनकडून अर्थसहाय्य प्राप्त होत असून हे पोर्टल देशविरोधी आहे. या मीडिया पोर्टलने चीनकडून निधी मिळवत केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. तसेच दुबे यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.
नेविल रॉय सिंघम आणि त्यांचे न्यूज क्लिक हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे धोकादायक अस्त्र असून जगभरात चीनच्या राजकीय अजेंड्याला बळ पुरवत असल्याचे आता द न्यूयॉर्क टाइम्स यासारख्या वृत्तपत्रांनीही मान्य केले असल्याचा दावा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.
‘मोहब्बत की दुकान’मध्sय चिनी सामान
काँग्रेसची मोहब्बत की दुकान न्यूज क्लिकशी जोडली गेलेली आहे. राहुल गांधी यांच्या नकली मोहब्बत की दुकानमध्ये चिनी सामान आहे. न्यूज क्लिकला सुरुवातीपासून कोट्यावधी रुपयांचे फंडिंग प्राप्त झाले आहे. आम्ही हा देशविरोधी अजेंडा चालू देणार नसल्याचे ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले आहे.

चीनबद्दल प्रेम दाखविणे आणि भारताच्या विरोधात विदेशी भूमीतून दुष्प्रचार, विदेशी वृत्तसंस्थांच्या माध्यमातून प्रोपेगेंडाच्या अंतर्गत व्हायचे. ‘अँटी इंडिया आणि ब्रेक इंडिया’ मोहीम हे लोक चालवत होते. अशा लोकांचे सर्व सामान चिनी असून ते चीनचाच सन्मान करत असल्याची टीका ठाकूर यांनी केली आहे. न्यूज क्लिकला प्राप्त फंडिंगचे स्वरुप पाहिल्यास विदेशी नेविल रॉय सिंघमने याला निधी पुरविला आणि त्याला मागून निधी चीनकडून मिळत होता. या नेविल रॉय सिंघमचा थेट संपर्क चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या प्रोपेगेंडा आर्म आणि चीनची माध्यम कंपनी माकु ग्रूपसोबत होता असा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे.
काँग्रेसवर हल्लाबोल
न्यूयॉर्क टाईम्सकडून खुलासा होण्यापूर्वी भारत दीर्घकाळापासून न्यूजक्लिक हे चिनी प्रचाराचे एक धोकादायक अस्त्र असल्याचे जगाला सांगत राहिला. समान विचारसरणीच्या शक्तींकडून समथ्घ्&िन नेविल एक भारतविरोधी अजेंड्याला पुढे नेत आहे. 2021 मध्ये भारताच्या कायदा-अंमलबजावणी यंत्रणांनी मनी लॉन्ड्रिंगच्या ठोस पुराव्यांच्या आधारावर न्यूजक्लिक विरोधात चौकशी सुरू केल्यावर काँग्रेस आणि डावे पक्ष त्याचा बचाव करण्यासाठी सरसावले होते. काँग्रेसने नेविल आणि न्यूजक्लिकचा बचाव करणे स्वाभाविक आहे, कारण काँग्रेसच्या नेतृत्वासाठी राष्ट्रीय हित कधीच महत्त्वाचे राहिलेले नाही. काँग्रेस पक्षाने भारतात चिनी हितसंबंधांना बळ देण्यासाठी 2008 मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षासोबत एक करार केला होता. तसेच चिनी दूतावासाकडून राजीव गांधी फौंडेशनसाठी देणगी स्वीकारली होती, अशी टीका ठाकूर यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
मीडिया पोर्टल न्यूजक्लिकला विदेशातून सुमारे 38 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. ईडीच्या तपासात अमेरिकन धनाढ्या नेविल रॉय सिंघमकडून न्यूजक्लिकला सातत्याने निधी पुरविण्यात आल्याचे उघड झाले होते. नेविलवर चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध बाळगल्याचा आरोप आहे. न्यूजक्लिकला प्राप्त निधी तीस्ता सेटलवाड समवेत अनेक जणांमध्ये वाटण्यात आला होता असे ईडीला तपासात आढळून आले हेते. आता यासंबंधी द न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात कार्यकर्त्यांच्या संघटना, एनजीओ, बनावट कंपन्या आणि चीनसोबतच्या त्यांच्या नेटवर्कचा भांडाफोड करण्यात आला आहे. या पूर्ण नेटवर्कच्या केंद्रस्थानी नेविल रॉय सिंघम आहे. सिंघमने एक न्यूज वेबसाइट अन् न्यूजक्लिकला निधी पुरवून चीनच्या बाजूने वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला होता.









