केरळ विधानसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याची होतेय मागणी
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार राहुल ममकूटाथिल यांच्या विरोधात आक्षेपार्ह वर्तनाच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. राजकीय गोंधळानंतर केरळ काँग्रेसने सोमवारी राहुल यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून 6 महिन्यांसाठी निलंबित केले आहे. ही कारवाई एका ट्रान्सवुमनच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे. या तक्रारीत राहुल यांच्यावर बळजबरी आणि धमकाविल्याचे आरोप आहेत.
मागील आठवड्यात हा वाद उभा ठाकताच काँग्रेसने त्वरित राहुल ममकूटाथिल यांना युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्याचा आदेश जारी केला होता. परंतु पक्षाने त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास अद्याप सांगितलेले नाही. राहुल यांच्याविरोधात एका अभिनेत्री आणि लेखिकेने देखील गंभीर आरोप केले आहेत.
तर पक्षाकडून प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आल्याने राहुल ममकुटाथिल यांना आता विधानसभेतील कामकाजात भाग घेता येणार आहे, परंतु पक्षाच्या कुठल्याही अधिकृत कार्यक्रमात सामील होता येणार नाही.
पक्षाकडून डॅमेज कंट्रोल
काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ, विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन आणि वरिष्ठ नेते रमेश चेन्निथला यांना या मुद्द्यावर परस्परांमध्ये चर्चा केली होती. यानंतरच कारवाईचा निर्णय घेण्यात आला. याच्या माध्यमातून राहुल ममकूटाथिल यांना पक्षाच्या विधिमंडळीय बैठका आणि अन्य अधिकृत व्यासपीठांपासून दूर ठेवले जाणार आहे. वाद शमविण्यास हे पाऊल मदत करणार असल्याचे पक्ष नेत्यांचे मानणे आहे. परंतु पक्षाच्या काही महिला नेत्या म्हणजेच माजी आमदार शानिमोल उस्मान आणि विद्यमान आमदार उमा थॉमस यांनी राहुल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आमदार राहुल यांचे मौन
राहुल यांनी स्वत:च्या स्पष्टीकरणादाखल तक्रारकर्त्या ट्रान्सवुमन अवंतिकासोबतचे व्हॉट्सअॅप आणि फोनवरील संभाषणाचे पुरावे जारी केले. परंतु एका ऑडिओ क्लिपमध्ये एका महिलेला गर्भपातासाठी भाग पाडणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकाराबद्दल राहुल यांनी कुठलेच स्पष्टीकरण दिलेले नाही.









