कमलनाथ यांचा निकटवर्तीय भाजपमध्ये
वृत्तसंस्था/ भोपाळ
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मध्यप्रदेशात मोठा झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे निकटवर्तीय नेते सैयद जाफर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सैयद जाफर हे मध्यप्रदेश काँग्रेसचे महासचिव म्हणून कार्यरत होते.
मध्यप्रदेश भाजप कार्यालयात मुख्यमंत्री मोहन यादव आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांच्या उपस्थितीत जाफर यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. जाफर यांच्यासोबत आणखी 64 काँग्रेस नेत्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
कमलनाथ हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेदरम्यान जाफर यांनी भाजपच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट केल्या होत्या. तसेच त्यांनी सीएएचे समर्थन केले होते. देशात सध्या भाजपच्या बाजूने लाट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यांमुळे प्रभावित होत अनेक जण भाजपमध्ये सामील होत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केले आहे.









