सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे असंवेदनशील असून त्यांकडे माणुसकी राहीली नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. रविवारी ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवताना या सोहळ्यासाठी राज्यभरातून आप्पासाहेबांचे अनुयायी आले होते. त्यापैकी अनेकांना उष्माघात झाला. यापैकी ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या ११ जणांच्या मृत्यूला संपुर्णपणे राज्य सरकार जबाबदार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, “काल झालेल्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सरकारचे कान टोचले असून मनुष्य ही जात आहे आणि मानवता हा धर्म आहे असं ते म्हणाले. तसेच या कार्यक्रमाला आलेली जनता ही आप्पासाहेबांबद्दल असलेल्या प्रेमापोटी आली होती. हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम असल्याने मोठ्या प्रमाणात लोक येणार हे सरकारला माहिती असूनही सरकारने या लोकांसाठी सावलीची व्यवस्था केली नाही. एवढी मानवताही या सरकारमध्ये राहिलेली नसून हे सरकार असंवेदनशील आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी “या माणुसकी गमावलेल्या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. देशात आज शेतकऱ्यांचा आणि बेरोजगार लोकांचा मृत्यू होत असताना सध्याचे सरकार फक्त जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहे. कालच्या या घटेनेने महाराष्ट्राची अतोनात बदनामी झाली असून याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच सरकारने आपली चूक मान्य करावी,” असे ते म्हणाले.








