काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला 5 आमदारांची उपस्थिती : रात्री उशिरा 4 आमदार मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या भेटीला दिगंबर कामत कुठे? कळण्यास काही मार्ग नाही
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस पक्षाचे आठ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सर्वत्र पसरली असून राज्यात राजकीय हालचाली जोरात सुरु झाल्या आहेत. फुटीचे पत्र स्वीकारण्यासाठी सभापती रमेश तवडकर रविवारी दिवसभर पर्वरी कार्यालयात उपस्थित होते. मडगाव येथे काँग्रेस आमदारांची बैठक गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी घेतल्यानंतर सर्व आमदार पणजीला निघाले. त्यातील काही आमदार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तिनो येथील बंगल्यावर पोहोचले तर काही आमदार काँग्रेस भवनात दाखल झाले. कोणत्याही आमदारांनी सभापती रमेश तवडकर यांना कोणत्याही प्रकारचे पत्र सादर केले नाही, त्यामुळे नेमके कोणते आमदार फुटले की नाही आणि कोण काँग्रेस पक्षात राहिले ते उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.
विरोधी पक्षनेते मायकल लोबो, साळगांवचे आमदार केदार नाईक, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई आणि शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो असे एकूण चार आमदार रात्री उशिरा डॉ. सावंत यांच्या बंगल्यावर हजर झाले. दिगंबर कामत यावेळी हजर नव्हते, तरीही ते या गटात आहेत, अशी माहिती मिळाली. दिनेश गुंडुराव यांनी पत्रकार परिषदेत दिगंबर कामत यांनी काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला, असे वक्तव्यही केले आहे. म्हणजे तेही फुटल्यात जमा असल्याचे गुंडुराव यांनीच स्पष्ट केले आहे.
एल्टन डिकॉस्ता, युरी आलेमांव, रुडॉल्फ फर्नांडिस व कार्लुस फरेरा, संकल्प आमोणकर हे आमदार काँग्रेस भवनात उपस्थित होते. त्यामुळे नेमके किती आमदार फुटले तेच रात्री साडेनऊपर्यंत स्पष्ट झालेले नाही. इतर काँग्रेस आमदार कुठे आहेत? याचाही पत्ता लागत नाही.
काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला 5 आमदार उपस्थित राहिल्यामुळे 8 आमदार कसे फुटणार? असा प्रश्न निर्माण झाला. कारण काँग्रेस पक्षाकडे एकूण 11 आमदार असून दोन तृतीयांश आमदार फुटण्यासाठी 8 आमदारांची बंडखोरी गरजेची आहे. या फुटीचे कारस्थान आधीच शिजले होते आणि त्यांना भाजपमध्ये सामील करुन घेण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी मान्यता दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.
या फुटीरांना दिल्लीत भाजप श्रेष्ठींसमोर नेण्यासाठी सायंकाळी 4 वा. चार्टर विमानाची सोय करण्यात आली होती तथापि, कुठेतरी काहीतरी बिनसले आणि हा प्रयोग यशस्वी झाला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आलेक्स सिक्वेरा हे आजारी असल्याने काँग्रेस भवनात पोहोचू शकले नाहीत असा खुलासा काँग्रेसतर्फे करण्यात आला. त्यामुळे काँग्रेस आमदारांमध्ये आता 6 विरुद्ध फुटीर 5 असे दोन गट पडल्याचे समोर येत आहे.
मडगावातून सुरु राजकीय नाटय़

काँग्रेसच्या बैठकीला आमदारांची उपस्थिती : मात्र पडदय़ाआड भाजपकडे संपर्क
शनिवारी रात्रीपासून गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला. काँग्रेसचे आठ आमदार फुटून भाजपकडे जाणार असल्याची चर्चा सर्वत्र होती. काँग्रेस पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर हे शर्थीने प्रयत्न करीत होते. काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांना फातोडर्य़ातील एका हॉटेलवर ठेवण्यात आले. रविवारी दिवसभर या हॉटेलवर राजकीय घडामोडी रंगल्या व संध्याकाळी काही आमदारांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व त्यांनी आपला मोर्चा पणजीकडे वळविला.
काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार एकसंघ आहेत. कुणीही बंडखोरी करणार नाही याची हमी काँग्रेसचे सर्वच आमदार देत होते. पण, पडदय़ाआड अनेकांचा भाजपकडे संपर्क आहे. खुद्द विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी ही काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार एकसंघ असल्याचा दावा प्रसार माध्यमांशी केला. पण, संध्याकाळी त्यांनी पणजीत काँग्रेस भवनात प्रवेश केला नसल्याने ते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले.
ज्येष्ठ नेते दिगंबर कामत हे काँग्रेस पक्षावर प्रचंड नाराज होते. फक्त ते उघडपणे बोलण्याचे टाळत होते. ते दिल्लीतील भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांनी अनेकदा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर दिल्लीवारी केली होती. त्यांना कधीही भाजपमध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो हे जवळपास स्पष्ट होते. फक्त भाजपमध्ये येताना त्यांनी आपल्या सोबत शक्य तेव्हढे आमदार आणावे अशी अट त्यांच्या समोर होती. गेल्या दोन दिवसांपासून ते काँग्रेस आमदारांच्या संपर्कात होते. तसेच त्यांचे हितचिंतक देखील त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करीत होते.
काँग्रेसच्या आमदारांवर प्रचंड दबाव
काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. दिल्लीपासून गल्ली पर्यंतचे भाजपचे नेते सातत्याने काँग्रेस आमदारांच्या संपर्कात होते. त्यामुळे काही आमदारांनी आपले मोबाईल स्वीच ऑफ ठेवणे पसंत केले. आमदारांकडे प्रत्यक्ष संपर्क होत नसल्याने आमदारांच्या जवळच्या व्यक्तीकडे देखील संपर्क साधला जात होता. सातत्याने संपर्क केला जात असल्याने काँग्रेसचे आमदार हतबल झाले होते.
मायकल लोबोची पडदय़ाआड सूत्रे
विरोधी पक्षनेते मायकल लोबो हे शनिवारी पणजीत काँग्रेस आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहीले. त्यानंतर काल त्यांनी मडगावात देखील काँग्रेस आमदारांच्या बैठकीला उपस्थिती लावली व काँग्रेसचे सर्व आमदार एकसंघ असल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात ते पडदय़ाआडून सूत्रे हलवित होते. मडगावच्या बैठकीला ते उपस्थित राहिले खरे परंतु, त्यांची देहबोली सर्व काही सांगून जात होती.
40 ते 50 कोटीची ऑफर
प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसच्या आमदारांना 40 ते 50 कोटींची ऑफर भाजपकडून दिली जात असल्याचा दावा प्रसार माध्यमांशी बोलताना केला. काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी बंडखोरी करावी यासाठी खाण उद्योजक, कोळसा माफिया तसेच दिल्लीतील भाजपचे नेते प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या उमेदवारांनी देवासमोर शपथ घेतली होती की, निवडून आल्यानंतर पक्षांतर करणार नाही याची आठवण करून देत गिरीश चोडणकर म्हणाले की, देवासमोर शपथ घेणारे पक्षाच्या नेत्यांना तसेच लोकांना फसवू शकतात. पण, ते देवाला कसे काय फसवू शकतात. तसे झाल्यास लोकांची देवावर श्रद्धाच राहणार नाही.
पक्षाचे आमदार कसे भाजपमध्ये जाणार
दिनेश गुंडूराव यांनी बोलावलेल्या बैठकीत काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार उपस्थित आहे. त्यामुळे कोण भाजपमध्ये जाणार असा सवाल आमदार संकल्प आमोणकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. उद्यापासून विधानसभा अधिवेशन सुरू होत आहे. त्यावर सरकारला कसे घेरावे यासाठी चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र पॅर्टन होईल का ? यावर ते म्हणाले की, महाराष्ट्रात काय झाले, ते आम्हाला लागत नाही. आम्हाला गोव्याची काळजी आहे.
अफवा सर्वत्र आहे
काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशा अफवा सर्वत्र आहे. पण, एका तरी आमदाराने स्वताहून भाजपमध्ये जाणार असल्याचे कुठे सांगितले आहे का असा सवाल नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी उपस्थित केला. आपल्याला कुणीच बोलावले नव्हते. फक्त दिनेश गुंडूराव हॉटेलवर असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना भेटण्यासाठी आपण आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
फातोडर्य़ातील त्या हॉटेलवरून काँग्रेसचे आमदार बाहेर पडल्यानंतर काही जणांनी आमदार दिगंबर कामत यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली व तेथून सर्व जण पणजीला जाण्यासाठी बाहेर पडले. त्यात मायकल लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई यांचा समावेश होता.
फुटीरांचे मनसुबे उधळले मायकल लोबोंची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी
दिगंबर कामतवर होणार कारवाई
निवडणूक होऊन पुरते चार महिनेसुद्धा उलटतात न उलटतात तोच स्वतःच्या जहाजाला भोक पाडून भाजपच्या सत्तेच्या जहाजात उडय़ा मारण्यास सज्ज झालेल्या काँग्रेसच्या फुटीरांचे मनसुबे आवश्यक संख्याबळ नसल्याने उधळले. त्यामुळे काँग्रेसला तूर्त दिलासा मिळाला आहे. विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि आमदार दिगंबर कामत यांनी याकामी पुढाकार घेत जोरदार प्रयत्न चालविले होते. परंतु या परीक्षेत सध्यातरी ते नापास झाले व काँग्रेस निश्ठावंतांनी समाधानाचा सुस्कारा सोडला.
मात्र वरील दोघांच्याही या कारवायांचे असंख्य पुरावे काँग्रेसच्या हाती लागले व त्यातून लोबो यांची पदावरून त्वरित हकालपट्टी करण्यात आली. कामत यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेतेपदी लवकरच नवीन नेत्याची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी दिली. दिगंबर कामत यांचे हे निर्लज्ज कृत्य त्यांना भविष्यात बरेच महागात पडणार असेही गुंडूराव म्हणाले.
काँग्रेसचा मोठा गट भाजपच्या गळाला लागल्याच्या वृत्तानंतर रविवारी दिवसभर राज्यात अफवांना ऊत आला होता. त्यासंबंधी खुलासा करण्यासाठी काँग्रेसने सायंकाळी 6.30 वाजता पत्रकार परिषद बोलावली होती, त्यामुळे अर्धा तास आधीच पत्रकारांनी काँग्रेस हाऊसमध्ये गर्दी केली होती. परंतु 7.30 वाजले तरी केवळ दोनच आमदार कार्यालयात उपस्थित होते. त्यावरून कोणतेही चित्र स्पष्ट होत नव्हते. अखेर पाच मिनिटांच्या फरकाने एकेक करत तीन आमदार कार्यालयात पोहोचले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि नंतर पत्रकार परिषद सुरू झाली. त्यावेळी गुंडूराव बोलत होते.
पत्रकार परिषदेस पक्षाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह कार्याध्यक्ष युरी आलेमाव, उपनेते संकल्प आमोणकर, आमदार कार्लुस फरेरा, रुडाल्फ फर्नांडीस आणि ऍल्टन डिकॉस्टा यांची उपस्थिती होती. पक्षात कितीही फुटीर असले आणि त्यांनी कितीही पक्षविरोधी कारवाया केल्या तरी आम्ही निराश होणार नाही. या क्षणी तरी कोण जातील कोण राहतील हे नक्की सांगता येणार नाही. तरीही सध्या जे आहेत त्यांच्याशी आम्ही एकसंध राहणार आहोत, असे गुंडूराव म्हणाले.
लोबो, कामत घरभेदी
रविवारी दिवसभरात राज्यात अफवांना आलेला ऊत आणि त्यातून चाललेल्या चर्चेवर बोलताना गुंडूराव यांनी या एकुण प्रकारास काँग्रेसचेच दिंगबर कामत आणि मायकल लोबो हे दोन घरभेदी नेते जबाबदार असल्याचा दावा केला. त्यांनीच विरोधी भाजपशी हातमिळवणी करून काँग्रेसला खिंडार पाडण्याचे प्रयत्न केले, असे गुंडूराव म्हणाले.
याच दिगंबर कामत यांनी यापूर्वी मंदिर, चर्च आणि मशिदीत जाऊन सर्व सहकारी आमदारांना अखंड आणि एकसंघ राहण्याची शपथ दिली होती. ’कोणत्याही परिस्थितीत आम्ही फुटणार नाही, पक्षाशी प्रामाणिक राहणार, आणि प्रत्येक निर्णय सर्वांनुमते घेणार’, असे ते म्हणाले होते. तसेच, ’जो कोणी घेतलेल्या शपथेशी प्रतारणा करेल तो परमेश्वराच्या दरबारात अपराधी ठरेल आणि त्या पापाची शिक्षा त्याला मिळेल’, असेही कामत यांनी म्हटले होते. या सर्वांची आठवण गुंडूराव यांनी करून दिली व सध्या कामत यांनी जी कुकर्मे केलेली आहेत त्यावरून त्यांची खरोखरच देवावर श्रद्धा आणि विश्वास आहे का? असा संशय निर्माण होतो, असे ते म्हणाले.
कामत आणि लोबो हे दोघेही काँग्रेसमध्ये राहून भाजपसाठी काम करत होते. कामत यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचविले तरीही काँग्रेसशी प्रतारण करून ते भाजपशी संधान बांधून राहिले. लोबो यांनीही तेच केले. हल्लीच काँग्रेमध्ये प्रवेश केलेला असतानाही लोबोंवर काँग्रेसने विश्वास ठेवला व विरोधी पक्षनेतेपद बहाल केले. परंतु हल्लीच्या काळात दाखल झालेल्या अनेक तक्रारीपासून स्वतःची कातडी वाचविण्यासाठी लोबो यांनी भाजपशी जवळीक साधली, असे गुंडूराव म्हणाले.
भाजपला केवळ गोव्यातच नव्हे तर संपूर्ण देशात स्वतःची मक्तेदारी प्रस्थापित करायची आहे. त्यांना एक संस्कृती, एक धर्म, एक भाषा, एक नेता आणि एकहाती सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी पैसा, सत्ता, पक्ष या सर्वांचा वापर होत आहे. त्यांना प्रश्न विचारणारे, उघडे पाडणारे विरोधक नको आहेत म्हणुनच सर्व विरोधकांना आणि खास करून काँग्रेस पक्षाला संपवायचे आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करतानाच भाजप आपल्या राष्ट्रीय नेत्यांच्या माध्यमातून सुद्धा काँग्रेस आमदारांवर आपल्या गोटात येण्यासाठी दडपण आणत आहेत. ब्लॅकमेल करत आहेत.
फुटण्यापूर्वी विचार करावा : पाटकर
काँग्रेस पक्ष सोडताना प्रत्येक आमदाराने विचार करावा. सत्तेच्या मोहापायी पक्ष बदलण्याच्या नादात राजीनामा द्यावा लागल्यास कोणत्या तोंडाने पुन्हा लोकांसमोर जाणार याचा खास करून प्रथमच विजयी झालेल्यांनी तरी निश्चितच विचार करावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष श्री. पाटकर यांनी केले.









