अनेक सुविधा विनामूल्य देणार, विजयाचे आवाहन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचा वचननामा काँग्रेसने घोषित केला आहे. प्रत्येक महिलेला महिन्याला 2,500 रुपये, प्रत्येक गरजवंत घराला 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, प्रत्येक पात्र घराला महिना 300 युनिट वीज विमामूल्य, बेरोजगार युवकांना सरकारी आणि खासगी कारखान्यांमध्ये एक वर्षापर्यंत महिना 8 हजार 500 रुपयांची अॅप्रेंटिसशिप इत्यादी आश्वासने या वचननाम्यात नमूद आहेत.
काँग्रेसच्या या वचननाम्यात 22 क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. यात आरोग्य, शिक्षण आणि अन्न हे विषय प्रमुख आहेत. प्रत्येक पात्र कुटुंबाला प्रत्येक महिन्याला 5 किलो तांदूळ, 6 किलो डाळ, एक किलो खाण्याचे तेल, 2 किलो साखर इत्यादी खाद्यपदार्थ विनामूल्य दिले जाण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. दिल्लीत 100 इंदिरा खाद्यपेयगृहे स्थापन केली जाणार असून तेथे 5 रुपयांमध्ये जेवण दिले जाणार आहे. दिल्लीकरांनी यावेळी काँग्रेसला विजयी करुन आश्वासने पूर्ण करण्याची संधी द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
प्रकाशनासाठी मान्यवर नेते
दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देवेंदर यादव, काँग्रेसचे संपर्क प्रमुख जयराम रमेश आणि इतर अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत या वचननाम्याचे प्रकाशन बुधवारी करण्यात आले. या प्रसंगी नेत्यांनी आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष अशा दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली. दिल्लीची जीवनायिनी असणाऱ्या यमुना नदीच्या प्रदूषणाला हे दोन्ही पक्ष कारणीभूत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या सत्ताकाळात या प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतीही प्रभावी कामगिरी केली नाही. दिल्लीच्या जनतेने केँग्रेसला सत्तास्थापनेची संधी दिल्यास आम्ही हे यमुनाशुद्धीचे उत्तरदायित्व स्वीकारावयास सक्षम आहोत, असे प्रतिपादनही काँग्रेसने केले आहे.
तिन्ही पक्षांची वचनपत्रे
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तीन्ही प्रमुख पक्षांची वचनपत्रे आता जनतेसमोर आहेत. तिन्ही वचनपत्रांमध्ये मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. आश्वासनांची स्पर्धाच जणू या पक्षांमध्ये लागली आहे. आता दिल्लीची जनता कोणाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार, हे 8 फेब्रुवारीला मतगणनेनंतरच समजणार आहे. दिल्लीत 5 पुढच्या शनिवारी, अर्थात 5 फेब्रुवारीला मतदान होत आहे. प्रत्येक पक्षाने स्वत:च्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
काँग्रेसला आशा कितपत…
2015 आणि 2020 या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्ली राज्यात काँग्रेसची पाटी कोरीच राहिली होती. तसेच 2014, 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसला येथे एकही जागा जिंकता आलेली नाही. अशा प्रकारे सलग पाच मोठ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पदरात मतदारांनी काहीही टाकलेले नाही. अशी स्थिती या पक्षावर दिल्लीतच नव्हे, तर कोणत्याही अन्य राज्यात आलेली नाही. यावेळी काँग्रेस हे दुष्टचक्र तोडू शकते का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार यावेळीही काँग्रेसला विजय मिळणे दुरापास्त आहे. तथापि, काही जागा काँग्रेसला मिळविता आल्यास, आणि कोणत्याही पक्षास बहुमत न मिळाल्यास काँग्रेसच्या हाती सत्तेची सूत्रे जाऊ शकतात. काँग्रेसचे सध्या बहुमत मिळविण्याचे ध्येय नसून दिल्लीच्या विधानसभेत स्वत:साठी स्थान निर्माण करणे हेच आहे. त्यासाठी काँग्रेसने सर्व 70 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत. तसेच प्रचाराचाही धडाका लावला आहे. पक्षाचे हे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. आम्हाला हलके समजू नका, असा काँग्रेसचा अन्य पक्षांना संदेश आहे.









