निकाल मान्य करण्याची गरज : काँग्रेसच्या भूमिकेपासून राखले अंतर
वृत्तसंस्था/ श्रीनगर
इंडी आघाडीतील महत्त्वपूर्ण घटक पक्षाने काँग्रेसच्या भूमिकेपासून स्वत:ला दूर केले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी ईव्हीएमवरील काँग्रेसचे आरोप फेटाळले आहेत. जेव्हा ईव्हीएमद्वारे काँग्रेसचे 100 हून अधिक खासदार निवडून येतात, तेव्हा हा पक्ष स्वत:चा विजय मानतो, तर काही महिन्यांनी निवडणुकीत पराभव झाल्यावर ईव्हीएमद्वारे मतदान पसंत नसल्याचे म्हणणे चुकीचे आहे असे म्हणत ओमर यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
ओमर अब्दुल्लांची ही टिप्पणी भाजपच्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे. विरोधी पक्ष जेव्हा जिंकतो तेव्हा ईव्हीएमला योग्य मानतो, तर पराभूत होताच ईव्हीएमला दोष देण्यास सुरुवात करतात असे भाजपचे म्हणणे आहे. मुलाखतीत अब्दुल्ला यांना तुम्ही भाजप प्रवक्त्याप्रमाणे विरोधकांच्या आरोपांना नाकारत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता त्यांनी जे योग्य आहे ते योग्य असे उद्गार काढले आहेत.
मी पक्षाच्या भूमिकेचे पालन करण्याऐवजी सत्याला सत्य आणि चुकीच्या गोष्टीला चुकीचे म्हणणे पसंत करतो. दिल्लीतील सेंट्र विस्ट हा अत्यंत चांगला प्रकल्प आहे. नव्या संसद भवनाची निर्मिती करविणे एक चांगला विचार होता असे माझे मानणे आहे. आम्हाला नव्या संसद भवनाची आवश्यकता होती. पूर्वीचे संसद भवन खूपच जुने झाले होते आणि वर्तमान गरजांच्या अनुरुप नव्हते असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
राजकीय पक्षांना ईव्हीएम विश्वास नसेल तर त्यांनी निवडणूक लढवू नये. जर तुम्हाला ईव्हीएमबद्दल समस्या असेल तर प्रत्येक निवडणुकीत त्याबद्दल समस्या असायला हवी असे ओमर यांनी काँग्रेसला सुनावले आहे.
ईव्हीएमवर खापर फोडू नका
जेव्हा एखादा पक्ष निवडणुकीत जिंकतो आणि पराभूत होतो तेव्हा दोन्हीवेळा ईव्हीएमद्वारेच मतदान झालेले असते. पक्षांनी स्वत:च्या पराभवासाठी ईव्हीएमवर खापर फोडू नये. एका निवडणुकीत मतदार तुमची निवड करतात, तर दुसऱ्या निवडणुकीत करत नाहीत. मी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालो होतो आणि विधानसभा निवडणुकीत विजयी झालो. माझ्या पक्षाला बहुमत मिळाले. दोन्ही निकाल मी स्वीकारले आणि ईव्हीएमला कधीच दोष दिला नसल्याचे ओमर यांनी म्हटले आहे.









