वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडी’च्या नेतृत्वावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेसने इंडी आघाडीचे प्रमुखपद सोडण्यासाठी तयार रहावे. या आघाडीचे नेतृत्व करण्यास इच्छुक असलेल्या नेत्याकडे ते सोपविले जावे. ममता बॅनर्जी यांच्यात ती क्षमता असून अन्य पक्षांचे नेतेही याकरता सक्षम असल्याचे अय्यर यांनी म्हटले आहे.
आघाडीच्या नेत्यावरून मला पर्वा नाही, कारण काँग्रेस आणि काँग्रेस नेत्याची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहणार आहे. पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असो किंवा इंडी आघाडीत असला तरीही काँग्रेसचे महत्त्व कमी होणार नाही. राहुल गांधी यांना इंडी आघाडीच्या अध्यक्षापेक्षा काँग्रेसचा नेता म्हणून अधिक सन्मान मिळेल असा दावा त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडीने तुलनेत चांगली कामगिरी केली होती. भाजपला स्वबळावर बहुमत मिळविता आले नव्हते. परंतु राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्यावर विरोधी पक्षांच्या आघाडीतील मतभेद तीव्र झाले आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीत सर्वाधिक मतभेद काँग्रेसच्या स्थितीवरून आहेत. हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर अनेक पक्ष आघाडीला नवे नेतृत्व मिळावे अशी मागणी करू लागले आहेत.
ममता बॅनर्जी यांनी अलिकडेच इंडी आघाडीच्या कामकाजासंबंधी नाराजी व्यक्त केली होती. तसेच संधी मिळाल्यास या आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा पुन्हा व्यक्त केली होती. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रमुख शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांना समर्थन जाहीर केले होते.
शाह यांच्यावरील टीका रालोद नेत्यांना भोवली
लखनौ : राष्ट्रीय लोकदलाने (रालोद) स्वत:च्या सर्व प्रवक्त्यांना पदावरून हटविले आहे. जयंत चौधरी यांच्या आदेशावर या सर्व नेत्यांना पदावरून हटविण्यात आले आहे. एका प्रवक्त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका वक्तव्यावर टीका केली होती, ज्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. रालोदने हे पाऊल वादामुळे निर्माण झालेली राजकीय कटूता दूर करणे आणि पक्षाची प्रतिमा कायम राखण्याच्या उद्देशाने उचलले आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांची जयंती आणि शेतकरी दिनी जयंत चौधरी यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. जयंत चौधरी हे केंद्रात मंत्री असून अमित शाह हे त्यांचे मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकारी आहेत. अशा स्थितीत रालोदच्या प्रवक्त्याने शाह यांच्यावर टीका केल्याने चौधरी यांची चांगलीच कोंडी झाली होती. अशा स्थितीत सर्व प्रवक्त्यांना पदावरून दूर करत चौधरी यांनी भाजपची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.









