भाजपचे राष्ट्रीय वक्ते डॉ. पासवान यांचा इशारा
बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक मेहनतीतून तयार केलेले भारताचे संविधान हे बदलले जाणार, असा चुकीचा प्रपोगंडा काँग्रेसकडून करण्यात आला. परंतु, हे पूर्णत: चुकीचे होते, हे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमधून दिसून आले. त्यामुळे काँग्रेसने संविधानाच्या नावावर राजकारण करू नये, असा इशारा भाजपचे राष्ट्रीय वक्ते डॉ. गुरुप्रकाश पासवान यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचीही काँग्रेसला नैतिकता नाही. डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतर काँग्रेसवाल्यांनी राजकारण कसे केले, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. भारतरत्न देण्यासाठीही विलंब करण्यात आला.
सध्या मात्र देशामध्ये आम्हीच आंबेडकरी विचारांचे पाईक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. परंतु, संविधानाला बळकटी देण्याचे काम कोणी केले, हे जनतेला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना अनेकवेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होईल, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. याचकाळात एनसीईआरटीच्या पुस्तकात आंबेडकरांचा अवमान करणारे छायाचित्र छापून आले होते. त्यामुळे त्यांच्याविषयी काँग्रेसला किती आत्मियता आहे, हे दिसून आले. तरीदेखील लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात असल्याचे पासवान यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला बेळगाव महानगर जिल्हा अध्यक्ष गीता सुतार, एसटी मोर्चाचे मोहन शिग्गीहळ्ळी, प्रकाश राठोड, राजकुंवर पावले यांसह इतर उपस्थित होते.









