64 वर्षांनंतर गुजरातमध्ये आयोजन : मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह 3000 प्रतिनिधी सहभागी होणार
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आज-उद्या (8-9 एप्रिल) गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती रिव्हरफ्रंट येथे होणार आहे. या अधिवेशनाला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह 3000 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याचदरम्यान, मंगळवार, 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता शाहीबाग येथील सरदार साहेबांच्या ऐतिहासिक ‘सरदार स्मारका’त एक महत्त्वाची काँग्रेस कार्यकारिणी बैठक होणार आहे.
गुजरातमध्ये आयोजित अधिवेशनात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर्स सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. देशात ट्रेंडिंग असलेल्या घिबली शैलीच्या पोस्टर्सची जादू सर्वत्र दिसत आहे. एअरपोर्ट रोड ते इव्हेंट सेंटरपर्यंत लावलेल्या पोस्टर्समध्ये काँग्रेस नेत्यांमधील पोस्टर वॉरची झलकही दिसते.
अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. 1961 नंतर प्रथमच म्हणजेच 64 वर्षांनंतर गुजरात राज्यात एआयसीसी अधिवेशन होत आहे. अखिल भारतीय काँग्रेस समिती ही काँग्रेस पक्षाची सर्वोच्च समिती असून तयाचे पहिले अधिवेशन 1885 मध्ये झाले होते. भारताच्या स्वातंत्र्याचा पाया 1938 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या हरिपूर अधिवेशनात घातला गेला. ऐतिहासिक हरिपूर अधिवेशनात काँग्रेसने भारतासाठी पूर्ण स्वराज्याचा (पूर्ण स्वातंत्र्य) ठराव मंजूर केला.
86 व्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य देखील सहभागी होतील. 8 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता पूज्य बापूंच्या साबरमती आश्रमात होणाऱ्या प्रार्थना सभेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाईल. यामध्ये काँग्रेस कार्यकारिणीसह सर्व सदस्य उपस्थित राहतील. 9 एप्रिल रोजीच्या बैठकीसाठी देशभरातील सुमारे 3000 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील.
गुजरातमधील काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाबाबत गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे मीडिया संयोजक डॉ. मनीष दोशी म्हणाले की, 100 वर्षांपूर्वी महात्मा गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी काँग्रेसची विचारसरणी योग्य मानली आणि 2025 हे वर्ष सरदार साहेबांची 150 वी जयंती आहे. अशा परिस्थितीत गुजरातमधील काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन 8 आणि 9 एप्रिल रोजी अहमदाबाद येथे होणार असल्याचे स्पष्ट केले.









