आज शोकसभा: ज्येष्ठ नेते विशेष विमानाने दिल्लीला रवाना
प्रतिनिधी / बेळगाव
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे बेळगाव येथे सुरु असलेला काँग्रेस अधिवेशन शतकमहोत्सव कार्यक्रम रद्द झाला आहे. शुक्रवार दि. 27 डिसेंबर रोजी येथे होणारे सरकारी व पक्षाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून पक्षाचे राष्ट्रीय नेते विशेष विमानाने नवी दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी गुरुवारी रात्री उशिरा सर्किट हाऊसमध्ये तातडीची पत्रकार परिषद घेऊन यासंबंधी माहिती दिली. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या शतकमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवार दि. 26 डिसेंबर रोजीचे सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडले. ज्या परिसरात काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. त्याच परिसरात गुरुवारी दुपारी 3 वाजता मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची बैठकही झाली. कार्यकारिणीनंतर रात्री काँग्रेस नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती. त्याचवेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी येऊन थडकली. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल आदी नेते तातडीने सांबरा विमानतळाकडे रवाना झाले.
विशेष विमानाने हे नेते रात्री नवी दिल्लीला रवाना झाले. कायदा मंत्री एच. के. पाटील यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची माहिती दिली. आपण एका श्रेष्ठ अर्थतज्ञाला गमावलो आहोत, असे सांगत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. रात्री उशिरापर्यंत दिल्लीला पोहोचण्यासाठी काँग्रेस नेत्यांची धडपड सुरू होती. दरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह कर्नाटकातील अनेक नेते अंत्यदर्शनासाठी नवी दिल्लीला जाणार आहेत. सिद्धरामय्या यांनी आपल्या ‘एक्स’ खात्यावर डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आज शोकसभा
उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी गुरुवारी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढे हा कार्यक्रम आयोजिण्याचा विचार केला जाईल. तसेच शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता शोकसभा घेऊन नेते मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच बेळगावमधील कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यभरातील स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना आमदार, खासदार, मंत्र्यांनी पोहोचविण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती केली.
बेळगाव अधिवेशनाच्या शतक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात गेल्या आठ दिवसांपासून अनेक काँग्रेस नेत्यांनी तळ ठोकले होते. पहिल्या दिवशीचे सर्व नियोजित कार्यक्रम उत्साहात पार पडले होते. मात्र डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र दु:खाची छाया पसरली आहे. केवळ कर्नाटकच नव्हे तर देशभरातील काँग्रेसचे मातब्बर नेते दोन दिवसांसाठी बेळगावात होते. यापैकी बहुतेक केंद्रीय व राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांना तातडीने नवी दिल्लीला रवाना व्हावे लागणार आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री बहुतेक नेते बेळगावातून निघण्याच्या तयारीला लागले होते.
आज शासकीय सुटी
बेंगळूर :
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे कर्नाटक राज्य सरकारने शुक्रवार 27 डिसेंबर रोजी शासकीय सुटी जाहीर केली आहे. तसेच राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना एक दिवसाची सुटी दिली आहे.









