52 मतदारसंघांसाठी एकाच्या नावाची वरिष्ठांकडे शिफारस
प्रतिनिधी / बेंगळूर
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी मागील आठवड्यात जाहीर केली होती. आता दुसरी यादी तयार केली असून ती 4 एप्रिल रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. काँग्रेसने 124 उमेदवारांची यादी जाहीर करताना विद्यमान आमदारांसह प्रमुख नेत्यांना तिकीट देण्याची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीत 52 मतदारंघांसाठी एकच नाव अंतिम करण्यात आले असून हायकमांडकडे पाठवून देण्यात आल्याचे समजते.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखाली 4 एप्रिल रोजी नवी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीसमोर दुसऱ्या उमेदवार यादीवर चर्चा केली जाणार आहे. या समितीत राहुल गांधी, के. सी. वेणूगोपाल, रणदीप सुरजेवाला यांच्यासह प्रमुख नेते आहेत.
उर्वरित 48 मतदारसंघांसाठी राज्य काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीने प्रत्येकी दोन-दोन उमेदवार यादी तयार केली आहे. त्यापैकी प्रथम प्राधान्य असणाऱ्याची निवड करून यादी केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवून देण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिली आहे.
52 मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावावर 4 एप्रिल रोजी शिक्कमोर्तब होईल. मात्र, उर्वरित 48 मतदारसंघांसाठी पक्षातील नेत्यांमध्ये पुन्हा करता येईल, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत 4 हजारापेक्षा कमी मतांनी पराभूत झालेल्या 9 उमेदवारांना या निवडणुकीतही संधी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.









