हरियाणाला दलाल अन् जावयांच्या स्वाधीन केले : गोहाना येथे पंतप्रधानांची प्रचारसभा
वृत्तसंस्था/ गोहाना
हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोनिपत जिल्ह्यातील गोहाना येथे प्रचारसभा घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचा ‘शाही’ परिवार देशातील सर्वात भ्रष्ट परिवार आहे. जेव्हा हायकमांडच भ्रष्ट असेल तर त्याखालील नेत्यांना लूट करण्याचा मुक्त परवानाच मिळतो. येथील शेतकऱ्यांच्या जमिनींची लूट करण्यात आली. राज्याला दलाल आणि जावयांच्या स्वाधीन करण्यात आले होते असे म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
भाजप सरकारमध्ये हरियाणा आता शेती आणि उद्योग दोन्ही क्षेत्रांमध्ये देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये स्थान बाळगून आहे. औद्योगिकीकरण वाढले तर याचा सर्वाधिक लाभ शेतकरी, गरीब आणि दलितांना होतो. मागील 10 वर्षांमध्ये पूर्ण जगात भारतावरील भरवसा वाढला आहे. आता भारत भ्रष्टाचार, परिवारवादापासून मुक्त होत प्रगती करत असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे. आगामी काहत कुठला देश सर्वाधिक प्रगती करेल तो भारतच असेल असे जगाला वाटत असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
दलितांच्या सशक्तीकरणात उद्योगांची मोठी भूमिका असते असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानणे होते. गरीब, दलित, वंचितांकडे पुरेशी जमीन नसते. अनेक गरीब सहकारी भूमीहिन असायचे आणि मजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याचे त्यांनी पाहिले होते. याचमुळे बाबासाहेबांनी कारखाने निर्माण झाले तर गरीब, दलित आणि वंचितांना संधी मिळत असल्याचे म्हटले होते. याचमुळे ते तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्यास सांगायचे. भाजपच्या धोरण निर्णयांमध्ये, भाजपच्या विचारांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा हाच विचार दिसून येईल. दलित आणि वंचित समाजाला उद्योगांमध्ये संधी देऊनच खरे सशक्तीकरण शक्य असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
काँग्रेसवर साधला निशाणा
हरियाणात आता जे नवमतदार आहेत, त्यांना 10 वर्षांपूर्वी हरियाणाला कशाप्रकारे लुटण्यात आले होते याची कल्पना नसेल. काँग्रेसने हरियाणाला दलाल अन् दामादांच्या (जावयांच्या) स्वाधीन केले होते. दलाल अन् दामादांपासून केवळ कमळ चिन्हच वाचवू शकते. कुठल्या-कुठल्या काँग्रेस नेत्यावर आरोप झाले आहेत हे लोकांना चांगलेच ठाऊक आहे. हरियाणात 10 वर्षांपूर्वी पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळविणे अवघड होते. शासकीय कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व्हायचा. हरियाणाला लूटणाऱ्या भ्रष्ट काँग्रेसपासून राज्याला दूर ठेवावे लागणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
गरीब कल्याणासाठी प्रयत्न
आज (बुधवारी) आमचे मार्गदर्शक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. अंत्योदय आणि गरीबांच्या सेवेसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दाखवून दिलेला मार्ग प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी संकल्प पथाप्रमाणे आहे. त्यांच्या प्रेरणातून भाजप भारताला विकासाच्या नवी उंचीवर नेत आहे, गरीबांचे कल्याण करत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
शेतीचा आकार होतोय कमी
सध्या भारतासमोर एक आव्हान असून त्याबदद्ल केवळ भाजपच बोलत आहे. आमच्या देशात शेतीचा आकार सातत्याने कमी होत आहे. परिवारातील सदस्यांची संख्या जसजशी वाढते, तसतशी जमिनीची विभागणी होत आहे. लोकसंख्या वाढत असताना कृषी क्षेत्राचा आकार कमी होत आहे. शेतीशी निगडित अर्थतज्ञाही शेतीसोबत कमाईचे अन्य स्रोत असावेत असे म्हणत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.