कारला ठोकरून ट्रक चढला दुभाजकावर : सुदैवानेच जीवितहानी टळली, अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी
बेळगाव : कारला ठोकरून भरधाव ट्रक दुभाजकावर चढल्याची घटना पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वेगेटच्या मध्ये घडली आहे. रविवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहिल्या रेल्वेगेटवरील बॅरिकेड्समुळे काँग्रेस रोडवर वारंवार अपघात घडत आहेत. याशिवाय पहिल्या रेल्वेगेटवरून मंडोळी रोडकडे जाण्यासाठी वाहनचालकांना मोठा वळसा घालून यावे लागत आहे. मंडोळी रोडला जाण्यासाठी वळसा घालतानाच कारला हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कार नागरी वाहतूक करणाऱ्या विमान कंपनीची आहे. वैमानिकाला आणण्यासाठी ही कार मंडोळी रोडकडे जात होती. त्यावेळी कारला अपघात घडला. भरधाव ट्रक केरळहून कोल्हापूरकडे जात होता. पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वेगेटच्या मध्ये आगरकर रोड क्रॉसवर कार वळविताना भरधाव ट्रकची कारला धडक बसली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक दुभाजकावर चढला. केवळ सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी ट्रकचालकावर दंडात्मक कारवाई केली आहे. पहिल्या रेल्वेगेटवर नऊ वर्षांपूर्वी घातलेल्या बॅरिकेड्समुळे पादचारी, वृद्ध, महिला, दिव्यांग, सायकलस्वार, विद्यार्थी, गवळी आदींना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या गैरसोयीबद्दल जिल्हा प्रशासनापासून राष्ट्रपतींपर्यंत निवेदन देऊनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. प्रशासकीय व्यवस्था नागरिकांच्या सोयीसाठी आहे की त्यांच्या अडचणीत भर घालण्यासाठी आहे? असा संशय येईल, असा प्रशासनाचा कारभार सुरू आहे.
बॅरिकेड्स उभे करून वाहतुकीचा बोजवारा
अत्यंत अशास्त्राrय पद्धतीने वाहतूक व्यवस्था हाताळण्यात येत आहे. पहिल्या रेल्वेगेटवर ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था करून वाहतूक पोलीस तैनात केले तर परिस्थिती हाताळता येणार आहे. मात्र, पोलीस व प्रशासकीय व्यवस्थेने आपल्यावरील जबाबदारी झटकण्यासाठी बॅरिकेड्स उभे करून वाहतुकीचा बोजवारा उडविला आहे. या भोंगळ कारभाराविरुद्ध सुभाष घोलप यांनी तब्बल नऊ वर्षे लढा सुरू ठेवला असून सोमवार दि. 19 जून रोजी दुपारी 4 वा. बॅरिकेड्सजवळ उपोषण करण्याचा निर्णयही घेतला आहे.
वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज
पिरनवाडी ते राणी चन्नम्मा चौक दरम्यान अवजड वाहनांमुळे अनेक शाळकरी मुले, महिला, तरुणांचे बळी गेले आहेत. प्रत्येक अपघातानंतर या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी केली जाते. जनमताचा रेटा वाढला की पोलीस प्रशासन आठवडाभर अवजड वाहतूक दिवसातील ठरावीक वेळेत रोखते. त्याचे विस्मरण झाले की पुन्हा अवजड वाहतुकीला सुरुवात होते. ट्रकचालकांचा सुसाट वेग लक्षात घेता पादचारी, सायकलस्वार व इतर वाहनचालकांचे जीव धोक्यात घातले जातात. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा विचार करून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी स्वत: लक्ष घालण्याची मागणी जनतेतून करण्यात येत आहे.









