पक्षात कुणाचा एकाधिकार असू नये : खासदार मनीष तिवारींनीही कान टोचले
वृत्तसंस्था /चंदीगड, नवी दिल्ली
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यावर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला लक्ष्य केले आहे. काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने त्याचे सत्तेत पुनरागमन होणे अशक्य आहे. काँग्रेस पक्ष हा अनेक जणांनी घाम गाळल्याने अन् रक्त सांडल्याने उभा राहिला होता. यावर कुणा एका व्यक्तीचे वर्चस्व असू शकत नसल्याचे कॅप्टन यांनी म्हटले आहे.
स्वतःचे पूर्ण जीवन काँग्रेस पक्षासोबत घालविलेल्या गुलाम नबी आझाद यासारख्या नेत्याला पक्षात कायम ठेवणे नेतृत्वाला शक्य झाले नाही. पक्षाच्या कामकाजाची पद्धत अन् वरिष्ठ तसेच अनुभवी नेत्यांना दिली जाणारी वागणूक अत्यंत चुकीची आहे. पक्षाने आझाद यांना बरेच काही दिले असले तरी त्यांनीही पक्षासाठी खूप काही केले आहे. ही एक परस्पर प्रक्रिया असल्याचे उद्गार कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काढले आहेत.
पक्षाला दिला सल्ला
गुलाम नबी आझाद यांच्यावर निराधार आरोप करण्याऐवजी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पक्षाची अशी स्थिती का होतेय याचा विचार केला जावा असा सल्ला कॅप्टन अमरिंदर यांनी काँग्रेसला दिला आहे.
आझादांचा निर्णय धाडसी
आझाद यांनी काँग्रेस सोडण्याचा घेतलेला निर्णय धाडसी आहे. एक प्रामाणिक नेता तत्व अन् आत्मसन्मानाशी तडजोड करू शकत नाही. पक्षाला संपविण्याचे काम काही विशेष स्वार्थ असलेल्या लोकांनी सुरू केले आहे. वेळोवेळी पक्षाच्या विरोधातील अनेक वादळांचा सामना करणारे तसेच पक्षासोबत उभे राहिलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी भाग पाडले जात असल्याचा आरोप कॅप्टन अमरिंदर यांनी केला आहे.
कॅप्टन यांचा झाला होता अपमान
कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पंजाब विधानसभा निवडणुकीच्या 3 महिन्यांपूर्वी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदावरून हटविले होते. मला अपमानित करण्यात आले होते. मला न कळविता आमदारांची बैठक घेण्यात आली होती असे कॅप्टन यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर कॅप्टन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पंजाब लोक काँग्रेस नावाचा नवा पक्ष स्थापन केला होता.
काँग्रेसवर संतापले मनीष तिवारी

गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकल्याच्या दुसऱया दिवशी म्हणजेच शनिवारी जी-23 गटातील नेते अन् खासदार मनीष तिवारी यांनी गटबाजीवरून पक्षावर टीका केली आहे. पक्षाने डिसेंबर 2020 मध्ये जी-23 गटाच्या सूचना लागू केल्या असत्या तर ही स्थिती उद्भवली असती. मी पक्षाचा भाडेकरू नव्हे तर सदस्य असल्याचे म्हणत त्यांनी स्वतःची स्थिती स्पष्ट केली आहे.
प्रभागात निवडणूक लढविण्याची क्षमता असलेले, काँग्रेस नेत्यांचे सेवक असलेले लोक पक्षाबद्दल ज्ञान देत असतील तर हा प्रकार हास्यास्पद आहे. काँग्रेस पक्ष एका गंभीर स्थितीत आहे. जे घडले ते खेदाचे अन् दुर्दैवी असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.
पक्षाचा भाडेकरू नव्हे तर सदस्य आहे. काँग्रेस सर्व निवडणुकांमध्ये पराभूत होत आहे, देशाच्या जनतेसोबत पक्षाला ताळमेळ राखता येत नसल्याचा हा पुरावा आहे. काँग्रेसची स्थिती चिंताजनक असल्याचे आम्ही 23 जणांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्राद्वारे कळविले होते. काँग्रेस पक्ष उभारणीत अनेक लोकांनी योगदान दिले आहे. याचमुळे कुणाला कुठले पद मिळाले असेल तर ते दया म्हणून नव्हे असे तिवारी यांनी म्हटले आहे.
उत्तर भारतात हिमालयीयन क्षेत्रात राहणारे लोक स्वाभिमानी अन् भावनाप्रधान असतात. मागील 1 हजार वर्षांपासून ते आक्रमकांच्या विरोधात लढत आहेत. कुणीही या लोकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये असे तिवारी यांनी नमूद केले आहे.









