चेन्नई :
तामिळनाडूतील भाजप नेत्या खुशबू सुंदर वादात सापडल्या आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी चेरी शब्दाचा वापर केला होता, ज्यानंतर तामिळनाडूत गदारोळ निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून खुशबू यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खुशबू यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. काँग्रेसचे नेते माझा पुतळा जाळत आहेत. माझे छायाचित्र असलेल्या पोस्टर्सवर चप्पलांनी मारत आहेत. माझ्या छायाचित्राला शेण फासत आहेत. यातून काँग्रेस महिलांचा किती आदर करतो हे दिसून येत असल्याची टीकात्मक टिप्पणी खुशबू सुंदर यांनी केली आहे.
खुशबू सुंदर यांनी तमिळ अभिनेते मन्सूर अली खान यांच्याकडून तृषा कृष्णनविरोधात करण्यात आलेल्या टिप्पणीप्रकरणी प्रतिक्रिया देताना ‘चेरी’ शब्दाचा वापर केला होता. खुशबू सुंदर यांच्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाला आहे. तमिळ भाषेत चेरी शब्द हा दलितांच्या वस्तीसाठी वापरण्यात येतो.









