इतर महापुरुषांनाही स्थान देण्याबाबत सिद्धरामय्यांचे विधानसभाध्यक्ष हेगडे-कागेरी यांना पत्र
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा भवनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासह सात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले. सावरकरांच्या प्रतिमेवरून पहिल्याच दिवशी काँग्रेस-भाजप संघर्षाची ठिणगी पडली असून मंगळवारी या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक बनण्याची शक्यता आहे. सोमवारी काँग्रेसने विधानसभेच्या प्रवेशद्वारावर धरणे धरले.
विधानसभेच्या सभागृहात सात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले. सभाध्यक्षांच्या उजव्या बाजूला स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर डाव्या बाजूला महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल व वीर सावरकर आणि मध्यभागी महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा लावण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले. यावेळी सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी, कायदामंत्री जे. सी. माधुस्वामी, पालकमंत्री गोविंद कारजोळ, सी. सी. पाटील, कोटा श्रीनिवास पुजारी, नारायण गौडा, भैरती बसवराज, प्रभू चौहान आदींसह अनेक नेते उपस्थित होते.
इतर राष्ट्रपुरुषांच्याबरोबरच स्वातंत्र्यवीर सावरकरांचीही प्रतिमा सभागृहात लावण्यासंबंधी तयारी करण्यात आली होती.
राजकीय पक्षांच्या नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. त्यामुळे रविवारी सायंकाळपासूनच यासंबंधी राजकीय चर्चेला तोंड फुटले होते. सोमवारी सकाळपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेविषयी गौप्यता पाळण्यात आली होती.
याच मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली असून अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पश्चिम प्रवेशद्वारावर काँग्रेसच्या आमदारांनी धरणे धरले. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासह पक्षाच्या आमदारांनी वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषांची प्रतिमा हातात घेऊन धरणे धरले. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संघर्षाला सुरुवात झाली आहे.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले, सावरकरांची प्रतिमा लावण्यासंबंधी सरकारने एकतर्फी निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून आपण धरणे धरले आहे. महात्मा गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल, विश्वगुऊ बसवेश्वर, स्वामी विवेकानंद यांच्याबरोबरच देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, थोर अध्यात्मिक गुऊ नारायण गुऊ, राष्ट्रकवी कुवेंपू आदींच्या प्रतिमा लावायला हव्या होत्या.
दरम्यान, सिद्धरामय्या यांनी विधानसभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांना पत्र पाठविले असून भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करणाऱ्या राष्ट्रपुरुषांची प्रतिमा लावण्याची मागणी पत्रात केली आहे. दिवंगतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. त्यामुळे सावरकरांच्या प्रतिमेच्या मुद्द्यावरून मंगळवारी भाजप-काँग्रेस संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
सभाध्यक्षांना अधिकार
वीर सावरकरांच्या प्रतिमेवरून सुरू असलेल्या संघर्षावर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली असून सभागृहात कोणत्या महापुरुषांच्या प्रतिमा लावायच्या? याचा अधिकार सभाध्यक्षांना आहे, असे सांगितले. यासंबंधी आपण सभाध्यक्ष व विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.









