कोल्हापूर प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या रद्द झालेल्य़ा खासदारकीचा निर्णयाला स्थगिती न देण्याच्या गुजरात हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात खोट्या केसेस दाखल करून त्यांना भाजप अडचणीत आणत असल्याचा आरोप भाजपवर करून कोल्हापूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गुजरात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोन वर्षाचे शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या निकाला विरोधात त्यांनी गुजरात सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने देखील हा निकाल कायम ठेवल्याने राहूल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेऊन या निकालाला आव्हान दिले. गुजरात उच्च न्यायालयाने देखील या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्यभारत काँग्रेस आक्रमक झाले आहे.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर आरोप केला. भाजप विरोधात बोलणाऱ्यांवर खोट्या केसेस करून त्यांची तोंड बंद करण्याची गुजराती स्टाईल देशाला आता माहीत झाली आहे. मोदी आणि आदानीच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांच्यावर खोटे आरोप करत खटला दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली गेली. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे असे म्हणत भाजपविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार पी एन पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.