केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा खळबळजनक आरोप
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला असून काँग्रेस राजवटीत एनसीईआरटीच्या पाठ्यापुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक विकृत स्वरुपाचे व्यंगचित्र मुद्रित करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
जवाहरलाल नेहरु हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चाबकाचे फटकारे मारत आहेत, अशा प्रकारचे हे व्यंगचित्र शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीईआरटीने तयार केलेल्या पाठ्यापुस्तकात मुद्रित करण्यात आले होते, असे प्रतिपादन त्यांनी केले. आज काँग्रेसला जो आंबेडकरप्रेमाचा उमाळा आला आहे, ते त्या पक्षाचे केवळ नाटक आहे. आंबेडकरांना कधीच काँग्रेसने आपले मानले नाही. सातत्याने त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न या पक्षाने केला. हे व्यंगचित्र काँग्रेसची मनोवृत्ती दाखवून देते, अशी टीका त्यांनी काँग्रेसच्या धोरणांवर केली.
भाजपच्या दबावाने चित्र मागे
मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या काळात हा व्यंगचित्राचा प्रकार घडला होता. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने या व्यंगचित्राचा निषेध करुन काँग्रेसवर दबाव आणला होता. नंतर त्यावेळचे मानवबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी हे चित्र पाठ्यापुस्तकांमधून मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, असा घटनाक्रम प्रधान यांनी मांडला. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या पाठ्यापुस्तकांमध्ये अशी व्यंगचित्रे कोणीही सहज छापत नाहीत. सरकार चालविणाऱ्या बड्या नेत्यांच्या मान्यतेशिवाय असा प्रकार करण्याचे दु:साहस कोणीही करु शकणार नाही. डॉ. आंबेडकरांसंबंधी काँग्रेसच्या मनात किती द्वेष भरलेला आहे, याचे हे उदाहरण असून आजचे काँग्रेसचे त्यांच्यावरील प्रेम हे मतांसाठी केलेले सोंग आहे, असा आरोप त्यांनी केला.
स्वत:ला भारतरत्न, बाबासाहेबांना नाही
काँग्रेस नेत्यांनी स्वत:च स्वत:ला भारतरत्न हा पुरस्कार दिला. तथापि, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कधीही यथायोग्य सन्मान दिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने मात्र, सदैव बाबासाहेबांचा आदरच केला. काँग्रेस पक्षाला हे बघवत नाही. त्यामुळे हा पक्ष खोट्या आणि घातक समजुती समाजामध्ये पसरविण्याची धडपड करीत आहे, अशी टीका धर्मेंद्र प्रधान यांनी केली.









