राजू सेठ, अभय पाटील, लक्ष्मी हेब्बाळकर, विठ्ठल हलगेकर विजयी
प्रतिनिधी/ बेळगाव
विधानसभा ही अत्यंत मोठ्या चुरशीने पार पडली तरी यावेळी भाजपला धक्का देणारी ही निवडणूक ठरली आहे. जिल्ह्यामध्ये काँग्रेसने 11 जागांवर विजय मिळविला असून भाजपला 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे. गणेश हुक्केरी यांनी सर्वात जास्त मते घेऊन मोठा विजय संपादन केला. त्या खालोखाल माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना मते मिळाली आहेत. एकूण 5 उमेदवारांनी 50 हजारांपेक्षा अधिक मतांनी प्रतिस्पर्धींचा पराभव केला आहे. यामुळे भाजपमधील प्रस्थापितांना चांगलाच दणका बसला आहे.
आरपीडी कॉलेज आवारात व आरपीडी सर्कलजवळ राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी नितेश पाटील हे त्याठिकाणी दिवसभर ठाण मांडून होते. याचबरोबर मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील आदींच्या नेतृत्वाखाली कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. प्रत्येक मतमोजणी केंद्रांबाहेर निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. मेटल डिटेक्टरमधून तपास करूनच उमेदवार, मतमोजणी एजंट, अधिकारी व पत्रकारांना मतमोजणी केंद्रांवर प्रवेश देण्यात येत होता. मोबाईलदेखील आत नेण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पोलिंग एजंटांना आपल्या उमेदवाराने किती मते घेतली आहेत, हे बाहेर सांगणे कठीण जात होते.
बेळगाव दक्षिण मतदारसंघात चुरस
मतमोजणी करताना सर्वच 18 मतदारसंघांतील ईव्हीएम यंत्रे टप्प्याटप्प्याने उघडण्यात आली. पहिला निकाल बेळगाव दक्षिण मतदारसंघाचा दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास जाहीर करण्यात आला. भाजपचे उमेदवार अभय पाटील आणि रमाकांत कोंडुस्कर यांच्यामध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. प्रारंभी भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. मात्र मध्यंतरी म. ए. समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी लढत देत होते. शेवटपर्यंत काँटे की टक्कर चालली होती. मात्र शेवटी रमाकांत कोंडुस्कर यांचा 12 हजार 308 मतांनी पराभव झाला.
बेळगाव ग्रामीणमध्ये लक्ष्मी हेब्बाळकर विजयी
बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तब्बल 1 लाख 7 हजार 619 मते घेऊन विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागेश मन्नोळकर यांना 51 हजार 603 मते पडली. तर म. ए. समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना 41 हजार 500 मते मिळाली आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर या 56 हजार 16 मतांनी विजयी झाल्या.
उत्तर मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ आणि भाजपचे उमेदवार डॉ. रवी बी. पाटील यांच्यामध्ये काँटे की टक्कर झाली. शेवटपर्यंत या दोघांमध्ये चढाओढ सुरू होती. एकूण 23 फेऱ्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र शेवटच्या चार फेऱ्यांमध्ये राजू सेठ यांनी आघाडी घेऊन डॉ. रवी पाटील यांचा पराभव केला. राजू सेठ यांना 68 हजार 863 मते ईव्हीएम यंत्रामधून मिळाली आहेत. तर डॉ. रवी पाटील यांना 64 हजार 312 मते ईव्हीएम यंत्रामधून मिळाली आहेत. पोस्टल मतदान मात्र रात्री उशिरापर्यंत देण्यात आले नव्हते. या मतदारसंघात म. ए. समितीचे उमेदवार अॅड. अमर किसन येळ्ळूरकर यांना 11 हजार 702 मतांवरच समाधान मानावे लागले आहे.
खानापूर मतदारसंघामध्ये मोठ्या चुरशीने निवडणूक पार पडली होती. यावेळी भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार विठ्ठल सोमान्ना हलगेकर यांनी 91 हजार 834 मते घेऊन त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांचा पराभव केला. डॉ. अंजली निंबाळकर यांना 37 हजार 205 मते मिळाली. तर निजदचे नासीर बागवान यांना 15 हजार 600 तर म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना 9 हजार 671 मते मिळाली आहेत. विठ्ठल हलगेकर यांनी तब्बल 54 हजार 629 मतांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 10 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 8 जागांवर समाधान मानावे लागले होते. आता काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. याचबरोबर संपूर्ण राज्यामध्येही काँग्रेसलाच प्राबल्य मिळाल्याने जिल्ह्यावर काँग्रेसचे वर्चस्व राहणार आहे. या निवडणुकीत निधर्मी जनता दल, अपक्ष, आप व इतर पक्षांना एकही जागा मिळाली नाही. भाजप आणि काँग्रेस यासह अपक्षांमध्ये खरी लढत झाली आहे. शनिवारी जाहीर झालेला जिल्ह्याचा निकाल धक्कादायक असाच असून काँग्रेसच्या परिस्थितीत मात्र सुधारणा झाली आहे.
सात जागांवर भाजप विजयी
काँग्रेसला अथणी, कुडची, कागवाड, चिकोडी, यमकनमर्डी, बेळगाव ग्रामीण, बैलहोंगल, बेळगाव उत्तर, रामदुर्ग, कित्तूर आणि सौंदत्ती या मतदारसंघांमध्ये यश मिळाले तर भाजपला निपाणी, खानापूर, हुक्केरी, बेळगाव दक्षिण, अरभावी, गोकाक आणि रायबाग या मतदारसंघात विजय मिळाला आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणीला सुऊवात झाली. एकाचवेळी सर्व 18 मतदारसंघांतील मतमोजणी वेगवेगळ्या इमारतीत सुरू करण्यात आली. दुपारी 1 वाजेपर्यंत एक स्पष्ट चित्र हाती आले तरी कोणत्या उमेदवारांनी किती मते घेतली, विजयाचे अंतर किती, याचा तपशील घालताना बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. प्रारंभी पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. मात्र ईव्हीएम यंत्रामधील मोजणी झाल्यानंतर मतदानाची आकडेवारी त्यामध्ये बेरीज केली जात होती.
चिकोडी-सदलगा मतदारसंघातून काँग्रेसचे गणेश हुक्केरी हे विजयी झाले. त्यांनी तब्बल 1 लाख 28 हजार 349 मते घेतली आहेत. भाजपचे रमेश कत्ती यांना 59 हजार 840 मते मिळाली. त्याठिकाणी गणेश हुक्केरी यांनी तब्बल 78 हजार 509 मतांनी विजय संपादन केला आहे. निपाणी मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार शशिकला जोल्ले विजयी झाल्या. त्यांना एकूण 73348 मते मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम रावसाहेब पाटील यांना 66 हजार 56 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे काका पाटील यांना 44 हजार 107 मते पडली आहेत. यामध्ये शशिकला जोल्ले यांनी विजय संपादन केला आहे.
अथणी मतदारसंघामध्ये लक्ष्मण सवदी यांनी तब्बल 1 लाख 31 हजार 404 मते घेतली. त्यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी महेश कुमठहळ्ळी यांना 55 हजार 282 मते मिळाली आहेत. लक्ष्मण सवदी यांनी तब्बल 76 हजार 122 मतांनी त्यांचा पराभव केला आहे. कागवाड मतदारसंघात काँग्रेसचे राजू कागे यांना 83 हजार 387 मते मिळाली तर भाजपचे श्रीमंत पाटील यांना 74 हजार 560 मते मिळाली आहेत. यामध्ये राजू कागे यांनी विजय संपादन केला आहे.
कुडची मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार पी. राजीव यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार महेश तम्मण्णावर यांनी 85 हजार 321 मते घेतली आहेत. तर पी. राजीव यांना 60 हजार 78 मते मिळाली आहेत. रायबाग मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी 57 हजार 500 मते घेऊन विजय संपादन केला आहे. त्यांनी जेडीएसचे प्रदीपकुमार माळगी आणि काँग्रेसचे महावीर मोहिते यांचा पराभव केला आहे. प्रदीपकुमार माळगी यांना 25 हजार 392 मते मिळाली तर काँग्रेसचे महावीर मोहिते यांना 22 हजार 685 मतांवर समाधान मानावे लागले.
हुक्केरी मतदारसंघामध्ये निखिल कत्ती यांनी बाजी मारली आहे. कत्ती यांनी 1 लाख 3 हजार 574 मते घेऊन काँग्रेसचे ए. बी. पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामध्ये ए. बी. पाटील यांना 61 हजार 23 मते मिळाली आहेत. अरभावी मतदारसंघात माजी मंत्री व भाजपचे विद्यमान आमदार भालचंद्र जारकीहोळी यांन्ााr 70 हजार 540 मते घेऊन आपला गड राखला. त्यांनी अपक्ष गडाद यांचा पराभव केला आहे.
गोकाक मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी 1 लाख 5 हजार 313 मते मिळवून विजय मिळविला आहे. त्यांनी काँग्रेसचे महांतेश कडाडी यांचा पराभव केला. महांतेश कडाडी यांना 79 हजार 901 मते मिळाली आहेत. यमकनमर्डी मतदारसंघात माजी मंत्री व अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सतीश जारकीहोळी यांना 1 लाख 2 हजार 90 मते मिळाली आहेत. त्यांनी भाजपचे बसवराज हुंदरी यांचा पराभव केला. हुंदरी यांना 43 हजार 79 मते मिळाली आहेत.
कित्तूर मतदारसंघामध्ये काँग्रसचे बाबासाहेब पाटील यांनी 77 हजार 536 मते घेऊन विजय संपादन केला. त्यांनी भाजपचे महांतेश दो•गौडर यांचा पराभव केला. दो•गौडर यांना 74 हजार 574 मते पडली आहेत. बैलहोंगल मतदारसंघात काँग्रेसचे महांतेश कौजलगी यांनी 58 हजार 408 मते घेऊन विजय संपादन केला आहे. त्यांनी भाजपचे जगदीश मेटगुड यांचा पराभव केला. सौंदत्ती-यल्लम्मा मतदारसंघात काँग्रेसचे विश्वास वैद्य यांनी 71 हजार 224 मते घेऊन विजय संपादन केला आहे. त्यांनी भाजपच्या रत्ना मामनी यांचा पराभव केला.
रामदुर्ग मतदारसंघात अशोक पट्टण यांनी विजय संपादन केला आहे. त्यांना 80 हजार 294 मते पडली आहेत. त्यांनी भाजपचे चिक्करेवन्ना यांचा पराभव केला आहे.
वेबसाईटला निकाल घालण्यास विलंब
सर्व पत्रकारांना माहिती देण्यासाठी वेबसाईट तयार करण्यात आली होती. त्या वेबसाईटसाठी मीडीया सेंटरमध्ये मोठी स्क्रीन उभे करण्यात आली होती. मात्र तातडीने त्यावर माहिती दिली जात नव्हती. काही मतदार संघामध्ये 20 फेऱ्या होत्या तर काही 23 तर काही त्याहून अधिक फेऱ्या होत्या. मात्र मतदान केंद्रांतून त्यावर लवकर अपलोड करण्यात येत नव्हते. त्यामुळे आघाडीवर कोण आहे आणि पिछाडीवर कोण आहे समजणेच अवघड झाले. त्यामुळे मीडीया सेंटरचा म्हणावा तसा उपयोग झाला नसल्याचे दिसून आले.
मतमोजणीच्या खोल्या होत्या अरुंद
मतमोजणी करण्यासाठी मोठ्या खोल्या हव्या होत्या. मात्र त्या खोल्या अरुंद असल्यामुळे पोलिंग एजंटना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यांना ईव्हीइमच्या माध्यमातून मते दाखविताना अधिकाऱ्यांनाही कसरत करावी लागत होती. त्यामुळे पोलिंग एजंटमधुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. काही खोल्यांमध्ये फॅनची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे उष्याने सारेच हैराण झाले होते.
शेवटी ते अधिकारी मतमोजणीसाठीही
महानगरपालिकेचे अधिकारी निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना इतरत्र बदली करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. तरी देखील त्यांची बदली करण्यात आली नाही. दरम्यान निवडणूक काळात तरी त्यांची बदली करणे महत्वाचे होते. मात्र तसे करण्यात आले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. काही लोकप्रतिनिधींच्या समर्थकांना मात्र त्या अधिकाऱ्यांच्या बाजुलाच खुर्ची घालून देण्यात आली होती. याबद्दलही अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
पोस्टल मतदान अपलोड करण्यास उशीरा
ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी पोस्टल मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र म्हणावी तशी जनजागृती झाली नसल्याने काही मोजक्याच व्यक्तींनी त्याचा फायदा घेतला होता. तरी देखील पोस्टल मतदान मोजणी करताना आणि मोजणी केल्यानंतर तातडीने त्याचा लेखाजोखा वेबसाईटला घालणे महत्वाचे होते. मात्र रात्री उशीरापर्यंत काही मतदार संघामध्ये पोस्टल मतदानाची आकडेवाडी घालण्यात आली नाही. त्यामुळे नेमकी आघाडी किती मतांची हे सांगणे आवघड झाले.
येळ्ळूरवासीय म.ए.समितीच्या पाठिशी ठाम
येळ्ळूर हा समितीचा बोलकिल्ला मानला जातो. यावेळी तर एकजुटीने सर्वांनी मतदान केले. ग्राम पंचायत सदस्यांसह म. ए. समितीच्या नेत्यांनी दररोज घरोघरी जाऊन प्रचार केला. म. ए. समितीला विजयी करा, असे आवाहन केले होते. येळ्ळूरमध्ये 10 हजार 189 मतदार आहेत. त्यामध्ये 7 हजार 642 जणांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजाला. त्यामध्ये 5 हजार 738 ही म. ए. समितीला मते मिळाली तर भाजपला 1489 मते आणि काँग्रेसला 241 मते मिळाली आहेत. हट्टी गावामध्ये एकूण म.ए.समितीला 255, भाजपला 123 आणि काँग्रेसला 1 तर यरमाळमध्ये म.ए.समितीला 79, भाजपला 369 काँग्रेसला 125 मते पडली आहेत.









