ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांनी नकार दिल्याने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर होते. त्यांनीही हे पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर मुकुल वासनिक यांचे नाव चर्चेत होते. पण राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत, यासाठी राजस्थान काँग्रेसने ठराव मंजूर केला आहे.
राजस्थान काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची शनिवारी बैठक झाली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. प्रदेश निवडणूक अधिकारी राजेन्द सिंह कुम्पावत हे या बैठकीस उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्षांना प्रदेश काँग्रेस कमिटी आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यांच्या नियुक्तीचे अधिकारी देण्याबाबतचा ठराव सर्व राज्यांमध्ये संमत केला जात आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, यासाठी राजस्थान काँग्रेसने ठराव मंजूर केला आहे. हिमाचल प्रदेश काँगेसकडूनही सोमवारी अशाच प्रकारचा ठराव मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पद्दुचेरी प्रदेश काँग्रेसनेही राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी केली होती.
अधिक वाचा : महाराष्ट्रात पावसाची ‘पंच’विशी
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. तर 19 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबरपासून नामांकन दाखल केले जाणार असून, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. अनेक राज्यांकडून राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष बनविण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे राहुल गांधीच पुन्हा अध्यक्ष बनणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.









