आमच्याकडे बहुमत असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री उधारीचा शेंदूर घेऊन फिरत आहेत. त्यांच्याबरोबर भाजपाचेही खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असून फक्त कॉंग्रेसच जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी काँग्रेस पुढे येत आहे असा हल्लाबोल कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांवर केला. तसेच राज्यात बेरोजगारी, महागाई वाढली असून त्यासंदर्भात कोणतीहा पाउले न उचलता सरकार कॅसिनो विधेयक आणून युवकांना देशोधडीला लावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विरोधी पक्षनेत्याचं नाव आम्ही फायनल केल्यानंतरच तो प्रस्ताव अध्यक्षांकडे सादर करुन त्यांच्याकडून दुजोरा मिळाल्यानंतर विरोधीपक्षनेत्याचे नाव आम्ही जाहीर करू असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
राज्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे, अधिवेशनाला जाण्यापुर्वी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले “महाराष्ट्राचं सरकार हे लुटारुंचं सरकार आहे. यापुर्वी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी तसेच महागाई कमी करण्यासाठी विविध घोषणा केल्या त्याचं काय झालं? मुख्यमंत्री म्हणतात की, आमच्याकडे बहुमत आहेत. मात्र त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहीजे कि तुमच्याकडे सगळा उधारीचा शेंदूर आहे.” असा टोला नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्याना लगावला आहे.
भाजपवर निशाणा साधताना नाना पटोले यांनी भाजपाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “भाजपाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी काँग्रेस पुढे येत असून काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आहे. महाराष्ट्राच्या जनतेने हे स्पष्ट केलं आहे की आम्ही विरोधात बसावं. आणि काँग्रेस आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडेल यात शंका नाही.” असंही नाना पटोले म्हणाले.








