ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress President election) अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या माघारीनंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. गेहलोत यांनी माघार घेतल्यानंतर दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांचे नाव पुढे आले होते. तसंच आपण अर्ज दाखल करणार असल्याची घोषणाही त्यांनी काल केली होती. दरम्यान, आज अर्ज भरण्याच्या अगोदरच दिग्विजय सिंह यांनी माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्याऐवजी मल्लिकार्जुन खर्गे यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीत उडी मारली आहे. मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे आज दुपारी अर्ज दाखल करणार आहेत.
दिग्विजय सिंह यांनी माघार घेतल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खर्गे हे गांधी कुटुंबाच्या पाठिंब्याने शुक्रवारी आज उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर (Shashi Tharoor)यांच्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेत विरोधी पक्षनेते आहेत. आता काँग्रेसमध्ये एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार त्यांना अध्यक्षपदासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा लागेल. वरिष्ठ नेते आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेल्या केसी वेणुगोपाल राव यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाबाबत माहिती दिली. या निवडणुकीत गांधी कुटुंबीय निष्पक्ष राहील आणि खर्गे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी झाले आहेत. जी २३ गटातील प्रमुख सदस्य असणाऱ्या भूपिंदर सिंह हुड्डा यांनीही खर्गे यांच्या उमेदवारीला समर्थन दिलं आहे.