अंकोला येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींचा घणाघात : काँग्रेसच्या राजवटीत खोट्या नावाने पैशांची लूट
पी. के. चापगावकर /कारवार
काँग्रेस सरकारच्या राजवटीत बोगस नावांवर सरकारी तिजोरी लुटण्याचा धंदा तेजीत सुरू होता. आपण पंतप्रधान झाल्यानंतर 3 लाख कोटी रुपये चुकीच्या हातांमध्ये जाण्यापासून रोखले. भाजपने नेहमीच ‘नागरिक प्रथम’ असे धोरण स्वीकारले तर काँग्रेसने ‘भ्रष्टाचार प्रथम’ असे धोरण स्वीकारले आहे. काँग्रेसने आपली शक्ती आणि वेळ देशाच्या विकासासाठी नव्हे; तर घराणेशाहीच्या विकासासाठी खर्च केला. कर्नाटकच्या लोकसंख्येपेक्षा अधिक बोगस नावे काँग्रेसने तयार केली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. बुधवारी दुपारी अंकोला तालुक्यातील गौरीकेरी येथे कारवार जिल्ह्यातील सहा मतदारसंघांतील भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर शरसंधान साधले. ते म्हणाले, काँग्रेसने 4 कोटी 30 लाख बोगस नावांनी रेशनवाटप केले, गॅस सबसिडी दिली, 1 कोटी बोगस विधवा पेन्शन मंजूर केली. अशा एकंदर 10 कोटी बोगस नावांवर सरकारच्या तिजोरीतील पैसे लुटण्यात आले. ही सर्व रक्कम काँग्रेस नेत्यांच्या तिजोरीत जमा होत होती, असा आरोप केला. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाचा उल्लेख न करता पंतप्रधान मोदी म्हणाले, दिल्लीतून मंजूर केलेल्या 1 रुपयापैकी केवळ 15 पैसे गावापर्यंत पोहोचत होते आणि 85 पैसे वाटेतच गायब होतात, असे एका पंतप्रधानांनी म्हटले होते. 85 टक्के वाटतेच गायब होणे म्हणजे ते सरकार 85 टक्के कमिशनचेच असावे. आता 85 पैसे कुणाच्या हातात पडत होते ते सांगायची गरज नाही.
मतयाचनेची ही पद्धत कोणती?
काँग्रेसची मतयाचनेच्या पद्धतीची खिल्ली उडवत मोदी म्हणाले, काँग्रेसचे नेते आपला एक नेता निवृत्त होणार आहे, असे सांगत मतयाचना करीत आहेत. मतयाचना करायची ही कोणती पद्धत? असा प्रश्न उपस्थित करून मोदी पुढे म्हणाले, भाजपला विकासाच्या बाबतीत कर्नाटकला ‘नंबर वन’ बनवायचे आहे. आमच्याकडे ‘रोड मॅप’ आहे. योजना तयार आहेत, दृष्टी आहे, मेहनत करायची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.
2014 पूर्वी अरबी समुद्र नव्हता काय?
किनारपट्टीवरील तालुक्यातील मच्छीमारी समाजातील मतांवर डोळा ठेवून पंतप्रधान म्हणाले, 2014 पूर्वी अरबी समुद्र नव्हता काय? येथे मासेमारी केली जात होती की नाही? तर मग मासेमारी व्यवसायासाठी स्वतंत्र सचिवालय का सुरू करण्यात आले नाही? असे प्रश्न उपस्थित करून मोदींनी आमच्या सरकारने मच्छीमारीसाठी स्वतंत्र मंत्री, स्वतंत्र खाते, स्वतंत्र अधिकारी आणि स्वतंत्र बजेट सुरू केले आहे. भाजप सर्वांसाठी कार्य करणारा पक्ष आहे. म्हणूनच आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपतींच्या खूर्चीवर बसविले आहे. अंकोला तालुक्यातील अतिमागास हालक्की समाजातील सुक्री गौडा, तुळसीगौडा यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले, असेही ते म्हणाले. य् ााप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपच्या उमेदवार रुपाली नाईक, दिनकर शेट्टी, सुनील नाईक, सुनील हेगडे, विश्वेश्वर हेगडे, शिवराम हेब्बार उपस्थित होते.
क्षणचित्रे
- तब्बल चाळीस वर्षांनंतर देशाच्या पंतप्रधानांचे कारवार जिल्ह्यात आगमन
- सभास्थळाला छावणीचे स्वरूप
- व्यासपीठाजवळच हेलीपॅडची निर्मिती
- 2 वाजता भाषणाला सुरुवात
- मोदेंच्या भाषणात अधूनमधून कन्नडमधील ठराविक शब्दांचा वापर
- य् ाक्षगानमधील अर्जुनाच्या भूमिकेमधील पात्राचे किरीट मोदींना घालण्यात आले
- इडगुंजी येथील द्विभुजी गणपती मूर्ती देऊन मोदींचा सत्कार
- मतदानावेळी ‘बजरंगबली की जय’ म्हणून मतदान करण्याचे आवाहन









