वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या नीलांबूर मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीवरून काँग्रेस आणि त्याच पक्षाचे खासदार शशी थरूर यांच्यात शुक्रवारीही वाक्युद्ध जारी राहिले. काँग्रेस पक्षाकडुन निवडणूक प्रचारासाठी आमंत्रित करण्यात आले नसल्याचा दावा थरूर यांनी केला होता. हा दावा केरळ काँग्रेसचे अध्यक्ष सनी जोसेफ यांनी फेटाळला आहे.
शशी थरूर यांचे नाव नीलांबूर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सामील होते. आम्ही ही यादी अधिकृत स्वरुपात जारी केली होती आणि निवडणूक आयोगालाही सोपविली होती. या यादीत थरूर यांचे नावही होते, परंतु ते बहुतांश वेळ विदेशात होते आणि मग दिल्लीत राहिले. ते या कालावधीत केरळमध्ये आले नसावेत. याहून अधिक मला काहीही सांगायचे नाही, असे सनी जोसेफ यांनी म्हटले आहे. ए.के. एंटनी यांना वगळून पक्षाच्या उर्वरित सर्व नेत्यांनी निवडणूक प्रचारात सहकार्य केले आहे. रमेश चेन्निथला आणि कोडिकुन्निल सुरेश यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाचे उमेदवार आर्यादत शौकत यांच्या समर्थनार्थ प्रचार केला असल्याचा दावा सनी जोसेफ यांनी केला.
तर थरूर यांनी पक्षाने नीलांबूर पोटनिवडणूक प्रचारासाठी बोलाविले नसल्याचे वक्तव्य गुरुवारी केले होते. प्रचाराच्या बहुतांश काळात मी अधिकृत राजनयिक दौऱ्यावर विदेशात होते. विदेश दौऱ्यावरून परतल्यावरही पक्ष नेतृत्वाकडून प्रचारात मी सामील होण्यावरून कुठलाही विशेष पुढाकार घेण्यात आला नाही. प्रचारात सामील होण्यासाठी मला एकही कॉल आला नाही, असे थरूर यांनी म्हटले आहे. तर पक्षनेतृत्वासोबत काही मतभेद आहेत, परंतु याला संघर्ष म्हणता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.









