काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नका
मध्यप्रदेशात बहुजन समाज पक्षाने देखील उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांसाठी बसप सर्वेसर्वा मायावती यांनी अशोकनगर येथे जाहीर सभा घेतली आहे. काँग्रेसच्या जातनिहाय सर्वेक्षणाच्या आश्वासनाला लोकांनी बळी पडू नये. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्यास टाळाटाळ केली होती, अशी टीका मायावती यांनी केली आहे.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या शासनकाळात काका कालेलकर आयोग आणि मंडल आयोगाने अन्य मागास वर्गासाठी आरक्षणाची शिफारस केली होती, परंतु काँग्रेसने कुठलेच पाऊल उचलले नाही. आता निवडणूक नजीक येताच काँग्रेस जातनिहाय सर्वेक्षणाबद्दल बोलत आहे. तर दुसरीकडे भाजपने दलित आणि आदिवासींचे शोषण केल्याची टीका मायावती यांनी केली आहे.
भाजप आणि काँग्रेस दोन्ही धनाढ्या अन् भांडवलदारांचे पक्ष आहेत. दोन्ही पक्षांनी मध्यप्रदेशच्या जनतेसाठी कुठलेच काम केले नाही. काँग्रेस आणि भाजपने आरक्षण संपविण्याचेच काम केले आहे. अलिकडेच केंद्र सरकारकडून महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे विधेयक आणले गेले, परंतु महिलांचे हित साधले जाईल अशी कुठलीही व्यवस्था लागू करण्यात आली नसल्याचा दावा मायावती यांनी केला आहे.









