दक्षिण गोव्यातील प्रमुख कार्यकर्त्यांकडे चर्चा
प्रतिनिधी /मडगाव
काँग्रेस पक्षाच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यात खळबळ माजली आहे. आठ आमदार गेल्याने काँग्रेस पक्षाला जबरदस्त फटका बसला. त्यातून सावरण्यासाठी काँग्रेस पक्षाने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. काल सोमवारी दक्षिण गोव्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मडगावच्या कार्यालयात आमंत्रित करून त्यांच्याकडे चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्षाचे कार्य जोमाने पुढे नेण्याचा सल्ला यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला
आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला तो केवळ स्वार्थासाठी, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे कार्यकर्त्यांना लाज न वाटता, जे आठ जण गेलेत, त्यांना लाज वाटली पाहिजे. हा कार्यकर्त्यांचा पराभव नव्हे. पक्षाचे कार्यकर्ते हेच पक्षाचे बळ आहे व कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कार्य करावे व पक्षाला पुन्हा एकदा मजबूत करावे असे मत विरिएटो फर्नांडिस यांनी काल कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
कार्यकर्त्यांच्या मनात संताप आहे, तो व्यक्त करण्याची संधी काल कार्यकर्त्यांना देण्यात आली. त्याच बरोबर पक्षाचे कार्य कशा पद्धतीने पुढे न्यावे व पक्षाचे कार्यक्रम राबविणे तसेच पक्षाची पुन्हा मुळापासून बांधणी करणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती श्री. फर्नांडिस यांनी दिली.
भाजपच खरा गुन्हेगार…
आठ आमदार फुटून गेले यात काँग्रेस पक्षाचा काहीच दोष नाही. खरा गुन्हेगार आहेत तो भाजप. कारण, त्यांनी पैसे देऊन आमदार खरेदी केल्याचा आरोप विरिएटो फर्नांडिस यांनी केला. मिरामार येथील एका हॉटेलात देवासमोर शपथ घेण्याची सक्ती ही दिगंबर कामत यांनी केली होती. त्यांनीच सांगितले होते की, महालक्ष्मी मंदिर, बांबोळी येथील फुलाचो खुरीस व बेती येथील दर्ग्यावर काँग्रेस पक्षाचा विश्वास घात करणार नाही अशी शपथ घेऊया असे सांगितले होते. पण, आपण याला विरोध केला होता. कारण, शपथ घ्यायची असेल तर ती घटणेवर घ्यावी, देवासमोर नव्हे. ज्यांनी देवासमोर शपथ घेऊया असे सांगितले, त्यांनीच देवाचा विश्वासघात केल्याचे श्री. फर्नांडिस म्हणाले.
सद्या जे काही चालले आहे ते लोकशाहीसाठी मारक आहे. असाच प्रकार जर्मनीत घेडला होता व एकाच पक्षाचे सरकार सत्तेवर आणण्याचे प्रयत्न झाले होते. तसाच प्रकार भाजपकडून घडत आहे आणि जेव्हा एकाच पक्षाचे सरकार सत्तेवर असते तेव्हा सर्व सामान्य जनतेचा आवाज दडपला जातोय. हा प्रकार अत्यंत घातक व चुकीचा आहे. काँग्रेस पक्ष सर्व सामान्य जनतेचा आवाज असून हा आवाज दडपला जाणार नाही. आम्ही गावोगावी फिरून पक्ष पुन्हा मजबूत केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ पुन्हा जिंकणार
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी पक्षा तर्फे लवकरच केली जाईल व दक्षिण गोव्यात पुन्हा एकदा काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला जाईल असे श्री. फर्नांडिस यावेळी म्हणाले. दक्षिण गोव्यात काँग्रेस पक्षाचा खासदार असून येथील मतदारांच्या पाठिंब्याने पुन्हा विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेस पक्षाचे कुडतरीचे कार्यकर्ते मोरेना रिबेलो उपस्थित होते.









