अदलाबदलीच्या परंपरेमुळे हिमाचलचे नुकसान
वृत्तसंस्था/ कांगडा
पंतप्रधान आवास योजनेत महिलांना हिस्सेदारी देणारा पक्ष भाजपच आहे. स्वयंपाकघरातील धूरापासून मुक्ती मिळवून देण्याचे काम भाजपने केले. घरोघरी शौचालय निर्माण करण्याचे काम भाजपने केले. घरोघरी वीज अन् नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे कार्य भाजपने केले आहे. तर काँग्रेस पक्ष हा विकासाचा शत्रू आहे. लोकांना समस्यांमध्ये जगण्यासाठी सोडून देण्याचे काम काँग्रेस करतो. परंतु भाजप हिमाचल प्रदेशला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे काम करणार आहे. याचमुळे राज्यात भाजप सरकार सत्तेवर राहणे आवश्यक आहे. अदलाबदलीच्या परंपरेने राज्याचे नुकसान झाल्याचे येथील जनतेला उमगल्याचे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत. हिमाचल प्रदेशच्या कांगडा येथील जाहीर सभेला त्यांनी बुधवारी संबोधित केले आहे.
काँग्रेस कधीच हिमाचलला स्थिर सरकार देऊ शकत नाही. काँग्रेस पक्षाचे आता दोन-तीन राज्यांमध्येच सरकार राहिले आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमधून विकासाचे वृत्त कधीच समोर येत नाही, केवळ राजकीय भांडणाच्या गोष्टी समोर येत असतात. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार अन् विकासातील अडथळा, काँग्रेस पक्षाचा आधार आजही घराणेशाही असल्याने त्याच्याकडून विकास होऊ शकत नसल्याचे विधान मोदींनी केले आहे.
जुनी परंपरा बदलतेय
यंदा उत्तराखंडच्या जनतेनेही जुनी परंपरा बदलत भाजपला विजयी केले आहे. उत्तरप्रदेशातही 40 वर्षांनी एखादा पक्ष पुन्हा विजयी होत पूर्ण बहुमतासह दुसऱयांदा सत्तेवर आला आहे. मणिपूरमध्येही भाजप दुसऱयांदा सत्तेवर आला असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
काँग्रेस म्हणजे अस्थिरतेची हमी
सत्तेवर असताना अशाप्रकारे काम केले जावे की मतदाराने पुन्हापुन्हा आम्हाला संधी द्यावी अशाप्रकारची राजकीय परंपरा निर्माण करण्याची आमची इच्छा आहे. याचमुळे आम्ही विकास अन् देशासाठी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक स्तरावर काम करत आहोत. काँग्रेस पक्ष म्हणजे अस्थिरता अन् घोटाळय़ांची हमी असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे.
5जीद्वारे होणार कायापालट
आगामी काळ हा 5जीचा आहे. हिमाचलमधील तरुण-तरुणी आणि येथील लोकांचा कायापालट 5जीमुळे होणार आहे. 5जीमुळे दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षण शहरांसारखे होणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.









