गांधी पुरस्कारावरून भाजपचे प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर शरसंधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील अमेरिका दौऱ्यावेळीही काँग्रेसने विरोध केला होता आणि आताही मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर काँग्रेसकडून विरोध केला जात आहे. याचबरोबर गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार देण्यास काँग्रेस विरोध करत आहे. हा विरोध गीता प्रेसचा नव्हे तर भगवद्गीतेलाच असल्याचा आरोप त्रिवेदी यांनी केला आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार देण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. गीता प्रेसला पुरस्कार देणे म्हणजे नथुराम गोडसेचा सन्मान करणे असल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी ट्विटद्वारे केले होते. जयराम रमेश यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस अडचणीत आला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रमेश यांच्या या वक्तव्याला विरोध दर्शविला आहे. जयराम रमेश हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात.









