ऑनलाईन टीम/तरुण भारत
केंद्र सरकारने पेट्रोल (petrol) आणि डिझेलच्या (diesel) दरात मोठी कपात केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात आठ रुपयांनी तर डिझेलवर सहा रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आता सरकारच्या या निर्णयावर विरोधक हल्लाबोल करत आहेत. सरकारवर हल्लाबोल करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (p chidambaram) म्हणाले, केंद्राने राज्यांना पुढे विहीर, मागे खाई अशा स्थितीत सोडले आहे. केंद्राने अधिक निधी किंवा अनुदान दिल्याशिवाय राज्य सरकारे पेट्रोल आणि डिझेलचा व्हॅट महसूल माफ करू शकतील का, असा प्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले, राज्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (nirmala sitharaman) यांनी या निर्णयाची शनिवारी याची घोषणा केली. आत यावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत त्यांनी, “पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची अधिसूचना जरी केली आहे.” तर अर्थमंत्र्यांनी ‘एक्साईज ड्युटी’ हा शब्द वापरला, परंतु कमतरता अतिरिक्त उत्पादन शुल्कात आहे, जी राज्यांसह सामायिक केली जात नाही. तसेच राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्काच्या वाट्याने फारच कमी महसूल मिळत आहे, ते म्हणाले की त्यांचा महसूल व्हॅटद्वारे येतो.
अर्थमंत्र्यांचे आवाहन व्यर्थ
वास्तविक, काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी राज्य सरकारांना व्हॅट कमी करून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे आवाहन केले होते. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर अर्थमंत्र्यांनीही तसाच सूर लावला. त्यावर पी चिदंबरम यांनी सरकारवर निशाणा साधत दोन महिन्यात प्रतिलिटर १० रुपयांनी वाढ करून पेट्रोलवर ९.५ रुपये आणि डिझेलवर ७ रुपयांची कपात केली. हे आधी लुटणे आणि नंतर कमी पैसे देण्यासारखे आहे.
त्यामुळे अर्थमंत्र्यांनी राज्यांना दिलेले आवाहन व्यर्थ आहे, असे ते म्हणाले. जेव्हा ती केंद्रीय उत्पादन शुल्कात १ रुपये कपात केली जाते तेव्हा त्यातील ४१ पैसे राज्यांना जातात, याचा अर्थ केंद्राने ५९ पैसे आणि राज्यांनी ४१ पैसे कापले आहेत. त्यामुळे राज्यांकडे बोट दाखवू नका. ते म्हणाले की, केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उपकर कमी केल्यावर खरी कपात होईल, जी राज्यांशी सामायिक केली जात नाही.
उत्पादन शुल्क कमी केले
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा सामना करणाऱ्या देशातील नागरिकांना केंद्र सरकारने शनिवारी मोठा दिलासा जाहीर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क (एक्साईज ड्युटी) आठ रुपयांनी आणि डिझेलवर सहा रुपयांनी कमी करत आहोत. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपयांनी तर डिझेलच्या दरात ७ रुपयांनी घट झाली आहे.