प्रतिनिधी/ पणजी
एका भाजप नेत्याची पत्नी उच्चपदी असलेल्या बँकेला मदत करण्यासाठीच मुख्यमंत्री ‘गुरुदक्षिणा’ योजना कार्यवाहित आणली आहे, असा आरोप गोवा प्रदेश महिला काँग्रेसने केला असून या योजनेला तीव्र आक्षेप घेतला आहे.
त्याचबरोबर अशी योजना राबवून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकार स्वत:चा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक यांनी केला आहे. काँग्रेस मुख्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी रेणुका देसाई, सई वळवईकर, पलेजिया रापोज आणि लविनीया डिकॉस्ता यांची उपस्थिती होती.
अॅक्सिस बँकेत उच्च पदावर असलेल्या भाजप नेत्याच्या पत्नीला खूश करण्यासाठीच सरकारने ही ‘गुऊदक्षिणा’ योजना कार्यवाहित आणली आहे का? अन्यथा अचानक जुनी परंपरा बदलून एका खासगी बँकेवर विश्वास ठेवण्यामागे कारण काय असावे? आधीच 28 उद्योगपतींनी भारताच्या बँका कशा लुटल्या हे देशाने पाहिले आहे. अशावेळी ‘राष्ट्रीयीकृत बँकांकडून खासगी बँकांमध्ये पगार वितरणाची व्यवस्था का करत आहे? असे सवाल नाईक यांनी उपस्थित केले आहेत.
सदर योजनेखाली देण्यात येणारा पगार मुख्यमंत्र्यांच्या खिशातून दिला जात असता तर तिला ‘गुऊदक्षिणा’ म्हणता आले असते. त्यामुळे ज्याअर्थी तो सरकारी तिजोरीतून देण्यात येतो, त्याअर्थी तिला ‘लोकदक्षिणा’ हे नाव सार्थ ठरेल, असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची खाती खासगी बँकांमध्ये स्थलांतरित करून सरकारने सध्याचा सेटअप बदलू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.









