डी. के. शिवकुमार यांचे स्पष्ट संकेत : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रयत्न
प्रतिनिधी/ बेंगळूर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षसंघटना आणखी मजबूत केली जाणार आहे. त्यासाठी द्वेषभावना सोडून इतर पक्षातून नेत्यांना काँग्रेसमध्ये आणण्याची सूचना दिली आहे. कोणाला पक्षात आणावे, हा निर्णय पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर सोडून देण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. याद्वारे त्यांनी राज्यात ‘ऑपरेशन हस्त’चे स्पष्ट संकेत दिले आहेत.
बेंगळूर येथे बुधवारी पत्रकारांशी ते बोलत होते. काँग्रेसमधून भाजपप्रवेश करून राज्यातील काँग्रेस-निजद युतीचे सरकार कोसळण्यास कारणीभूत ठरलेल्या केलेल्या काही आमदारांनी पुन्हा काँग्रेसचे दार ठोठावले आहे. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शिवकुमार म्हणाले, मोठ्यांना सोडून कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये आणून लोकसभा निवडणुकीसाठी पक्षसंघटना मजबूत करण्याची सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे, असे सांगितले. आमदारांना पक्षात प्रवेश देणार का?, या प्रश्नावर उत्तर देताना शिवकुमार यांनी, याविषयी स्थानिक नेतेच निर्णय घेतील. लोकसभा निवडणुकीत व्होट बँक वाढविणे, हेच लक्ष्य आहे. द्वेषभावना बाजूला ठेवून अन्य पक्षातील नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जाईल, असे सांगून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांना मातृपक्षात आणण्याचे संकेत दिले.
इतर पक्षांमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेसकडे वळणार आहेत. काँग्रेस-निजद युतीचे सरकार कोसळण्यास कारणीभूत ठरलेले काही नेतेही पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्यास तयार आहेत. यासंबंधी चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीवेळी अन्य पक्षातील 7 ते 8 आमदार काँग्रेसप्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केलेले विधान ‘ऑपरेशन हस्त’चे संकेत मानले जात आहे.
जानेवारीत पक्षांतर?
जानेवारी महिन्यात भाजपमधील 4-5 आमदार पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस प्रवेश करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीतच पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार काही जणांनी चालविल्याचे समजते. याविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत पक्षांतरपर्व सुरू होऊ शकते.
…पण; पहिले बाकडे मिळणार नाही : डॉ. परमेश्वर
काँग्रेस पक्षाची तत्वे मान्य करून भाजपचे आमदार पक्षप्रवेश करत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे वक्तव्य गृहमंत्री आणि काँग्रेस नेते डॉ. जी. परमेश्वर यांनी केले आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांना काँग्रेसचे दार उघडे असल्याचे संकेत मिळाले आहेत. यापूर्वी पक्ष सोडून गेलेले पुन्हा परतत असतील तरी अडचण नाही. मात्र, त्यांना पहिले बाकडे मिळणार नाही, त्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागेल. काँग्रेस प्रवेशाविषयी कोणत्या आमदाराने आपल्याशी चर्चा केली हे उघडपणे सांगणे शक्य नाही, असेही परमेश्वर यांनी सांगितले.
कोणीही आले तरी स्वागत : डी. के. सुरेश
काँग्रेस पक्षात कोणीही आले तरी त्यांचे स्वागत आहे. त्यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय हायकमांड घेईल, असे काँग्रेसचे खासदार डी. के. सुरेश यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसंबंधी दिल्लीत उच्चस्तरिय बैठक झाली आहे. निवडणुकीला कोणत्या पद्धतीने सामोरे जावे, उमेदवार कसा निवडावा, याविषयी चर्चा झाली आहे, असेही खासदार सुरेश यांनी सांगितले आहे.









