एका झटक्यात गमावले दोन तृतीयांश सदस्य
वृत्तसंस्था/ शिलाँग
मेघालयात नॅशनल पीपल्स पार्टीला मजबुती प्रदान करत काँग्रेसच्या एकूण 4 आमदारांपैकी तीन आमदार सत्तारुढ पक्षात सामील झाले. यामुळे 60 सदस्यीय विधानसभेत एनपीपीच्या आमदारांची संख्या 31 झाली. एनपीपीने आता मेघालयात स्वबळावर बहुमत प्राप्त केले आहे. एनपीपी, युडीपी आणि भाजप यांचे आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आहे.
विरोधी पक्ष काँग्रेसच्या खात्यात आता केवळ एक आमदार शिल्लक राहिला असून तोही विरोधी पक्षनेते आर.व्ही. लिंगडोह आहेत. सत्तारुढ आघाडीत आता आमदारांची संख्या 47 झाली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. सेलेस्टाइन लिंगडोह, गेब्रियल वाह्लांग आणि चार्ल्स मार्नगर यांनी विधानसभा अध्यक्ष थॉमस संगमा यांची भेट घेत आपण एनपीपीमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली.
हे तिन्ही सदस्य मेघालय विधानसभेत काँग्रेसच्या गटाचे दोन तृतीयांश सदस्य आहेत. यामुळे त्यांना विधानसभेत एनपीपीचे सदस्य म्हणून आसन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी एका आदेशात नमूद केले आहे. काँग्रेसने वाह्लांग आणि मार्गनर यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. एनपीपी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या तिन्ही आमदारांचे पक्षात स्वागत केले आहे.
सरकारच्या स्वरुपात आमची भूमिका मेघालयाच्या लोकांसाठी अधिकाधिक विकास सुनिश्चित करणे आहे. आगामी दशकासाठी आम्ही लक्ष्य निर्धारित केले असून ते प्राप्त करण्यासाठी काम करत आहोत. यशाच्या कहाणीचा हिस्सा होऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो असे संगमा यांनी म्हटले आहे.
एनपीपीच्या 31 आमदारांसोबत सत्तारुढ आघाडीतील घटक पक्ष युडीपीचे सभागृहात 12 सदस्य आहेत. तर एचएसपीडीपीचे 2 तर भाजपचे दोन सदस्य आहेत. विरोधी पक्ष तृणमूल काँग्रेसचे 5 आमदार तर व्हीपीपीचे 4 आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. तर सभागृहात दोन अपक्ष आमदार देखील आहेत. विधानसभेतील एक जागा सध्या रिक्त आहे.









