कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव एनएस बोसेराजू यांच्यासह तिप्पनप्पा कमकनूर यांना ३० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणूक लढलेल्या बाबूराव चिंचनसूर, आर. शंकर आणि लक्ष्मण सवदी यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानपरिशदेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत.
2012 ते 2013 मध्ये 10 महिन्य़ांसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री राहीलेल्या जगदिश शेट्टर यांनी भाजप सरकारचे नेर्तृत्व केले होते. गेल्या कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भाजपने त्यांना तिकिट नाकारल्याने नाराज झालेल्या जगदिश शेट्टर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पण विधानसभेसाठी निवडणूक लढलेल्या शेट्टर यांचा पराभव झाला होता. शेट्टर यांनी विरोधी पक्षनेते आणि विधानसभा अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
या विधानपरिषदेच्या निवडणूकीमध्ये तीन आमदारांनी आपल्या विधानपरिषदेच्य़ा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधानसभेसाठी शड्डू ठोकला होता. पण या निवडणूकीमध्ये फक्त लक्ष्मण सावदी विजयी झाले, तर बाबूराव चिंचनसूर, आणि आर. शंकर यांचा पराभव झाला होता.









