पक्षातून तिकीट देण्याची तयारी : काँग्रेसची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेंगळूर
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. आता पक्षाने तिकीट नाकारल्याने बंडखोरांनी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपने 212 उमेदवारांची नावे जाहीर केली असून विद्यमान 16 आमदारांसह अनेक माजी आमदार, माजी मंत्र्यांना तिकीट नाकारले आहे. त्यामुळे असंतुष्ट झालेले हे नेते काँग्रेस आणि निजदच्या संपर्कात आहेत. तर काहींनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा करत पक्षातील अधिकृत उमेदवाराविरुद्ध दंड थोपटले आहेत. काँग्रेसची तिसरी व निजदची दुसरी यादी शुक्रवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक काळात जनता परिवारातून बाहेर गेलेले पुन्हा एकदा निजदमध्ये परतत आहेत. मतपरिवर्तन करू शकणारे अनेक प्रभावी नेते भाजपमधून तिकीट न मिळाल्याने निजद आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. भाजपने बुधवारी रात्री 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यातही 7 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपमधील नाराजी पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. तिकीट नाकारण्यात आलेले विद्यमान आमदार एम. पी. कुमारस्वामी आणि नेहरु ओलेकार यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. ओलेकार यांनी आपल्याला निजद आणि आणखी एका पक्षाने पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिल्याचे सांगितले आहे. तर एम. पी. कुमारस्वामी यांनी बंडखोर उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे कलघटगीतील आमदार लिंबन्नावर, मायकोंडचे आमदार लिंबण्णावर, बैंदूरचे सुकुमार शेट्टी यांनी देखील भाजप़श्रेष्ठींच्या भूमिकेविषयी नाराजी उघड केली आहे. पहिल्या यादीतून वगळण्यात आलेले आमदार सोगडू शिवण्णा, रघुपती भट, दो•नगौडा पाटील यांनी बंडखोरीचे निशाण हाती घेण्याची तयारी केली आहे. भाजपच्या पहिल्या व दुसऱ्या यादीतून विद्यमान आमदारांना वगळल्याने बंडखोरी तीव्र झाली आहे. ती शमविण्यासाठी भाजप नेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तामिनाडूतील वरिष्ठ भाजप नेते अण्णा मलाई, मुख्यमंत्री बोम्माई, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी तिकीट हुकलेल्यांशी बोलणी सुरू केली असून त्यांची समजूत काढण्याचे प्रयतन चालविले आहेत. तर दुसरीकडे भाजपमधील अनेक असंतुष्टांना भाजप आणि निजदने गळ टाकले असून त्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत. निवडणुकीत बहुमतासह सत्तेवर येण्याचा चंग बांधलेल्या काँग्रेसने तडजोडीचे राजकारण करणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, 58 मतदारसंघातून पक्षांतर करून येणाऱ्यांसाठी तिकीट देण्याचा विचार या पक्षाने चालविला आहे. तर निजदने 95 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उर्वरित मतदारसंघातून काँग्रेसव व भाजपमधून येणाऱ्यांना तिकीट देण्याचा विचार चालविला आहे. त्यामुळे निजद आणि काँग्रेस पक्ष एक-दोन दिवसानंतर उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे.
निजदची दुसरी यादी आज : कुमारस्वामी
निधर्मी जनता दलाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून महिना उलटला आहे. त्यामुळे दुसरी यादी केव्हा जाहीर करणार, याविषयी निजद वरिष्ठ नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारी पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी काँग्रेस किंवा भाजपला बहुमत मिळणार नाही. त्यामुळे निजद पक्ष पर्यायी राजकीय पक्ष म्हणून विस्तार करत आहे, असे सांगितले.









