वृत्तसंस्था / पाटणा
विरोधी पक्षांच्या आघाडीपेक्षा काँग्रेसला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येच अधिक रस आहे, असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. ते जाहीर सभेत शुक्रवारी बोलत होते. त्यांच्या या नाराजीयुक्त टिप्पणीमुळे विरोधी पक्षांच्या आघाडीतील अंतर्विरोध स्पष्ट होत आहेत, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. भाजपनेही कुमार यांची खिल्ली उडविली आहे.
विरोधी पक्षांच्या आघाडीसंबंधी प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले. भाजपला सत्तेवरुन हटवून देश वाचवायचा आहे, यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, अशी हाक आपण दिली होती. या आघाडीतील एक प्रमुख पक्ष काँग्रेस हा आहे. या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसने करावे, असे मुंबई येथील बैठकीत ठरले होते. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या कामांमध्ये अधिक लक्ष घालेल अशी अपेक्षा होती. पण त्या पक्षाला विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या वाटतात, अशी टिप्पणी कुमार यांनी केली.
भाजपवर टीका
भाजपला देशात हिंदू विरुद्ध मुस्लीम असा संघर्ष पेटवायचा आहे. तथापि, बिहार राज्य या संघर्षापासून दूर आहे. भाजपला देशाचा इतिहासही बदलायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात कोणताही भाग घेतला नाही, हे सत्य भाजपला लपवायचे आहे, असा आरोप त्यांनी केला.









