कलम 370 हटविण्यात आल्यानंतरची पहिली निवडणूक :
वृत्तसंस्था/ कारगिल
2019 मध्ये कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीने बाजी मारली आहे. लडाख स्वायत्त पर्वतीय परिषदेच्या निवडणुकीत या आघाडीने भाजपवर मात केली आहे.
26 सदस्यीय लडाख परिषदेच्या निवडणुकीचा निकाल रविवारी उशिरापर्यंत पूर्णपणे लागला नव्हता. परंतु काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने भाजपला खूपच मागे टाकले आहे. 26 पैकी 22 जागांचा निकाल जाहीर करण्यात आला होता आणि यातील काँग्रेसने 8 तर नॅशनल कॉन्फरन्सने 11 जागांवर विजय मिळविला आहे. तर भाजपला केवळ 2 जागा मिळू शकल्या. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. मताधिकार बाळगणाऱ्या 4 सदस्यांना उपराज्यपाल नामनिर्देशित करणार आहेत.
मेहबूबा मुफ्तींकडून आनंद व्यक्त
नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यासारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांना कारगिलमध्ये विजय मिळाल्याचे पाहून आनंद झाल्याचे उद्गार पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी काढले आहेत.
कारगिल जिल्ह्यात 65 टक्के मतदान
पाचव्या एलएएचडीसी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात कारगिल जिल्ह्यात सुमारे 65 टक्के मतदान झाले होते. मागील महिन्याच्या प्रारंभी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर लडाख प्रशासनाने कारगिल क्षेत्रात पाचव्या एलएएचडीसीच्या निवडणुकीसाठी एका नव्या कार्यक्रमाची घोषणा केली होती. अधिसूचनेनुसार 30 सदस्यीय एलएएचडीसीच्या 26 जागांसाठी 4 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. काँग्रेसने नॅनशल कॉन्फरन्ससोबत या निवडणुकीकरता आघाडी केली होती.
भाजपकडून 17 उमेदवार
मागील निवडणुकीत भाजपने एक जागा जिंकली होती. तर पुढील काळात पीडीपीचे दोन नगरसेवक सामील झाल्याने ही संख्या तीनवर पोहोचली होती. परंतु यावेळी भाजपने एकूण 17 उमेदवार उभे केले होते. आम आदमी पक्षाने 4 उमेदवार उभे केले होते, तर 25 अपक्ष उमेदवारांनीही स्वत:चे भवितव्य आजमाविले होते.









