4 दिवसांमध्ये 4 देशांचे दौरे करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे मंगळवारी रात्री उशिरा युरोप दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. 6 सप्टेंबरपासून 10 सप्टेंबरपर्यंत ते फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड्स आणि नॉर्वे या देशांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी हे युरोपीय महासंघाचे सदस्य तसेच भारतीय समुदायाचे लोक अन् विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
नवी दिल्ली येथे जी-20 परिषद होत असताना राहुल गांधी यांचा हा युरोप दौरा होत आहे. जी-20 परिषद संपल्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी हे भारतात परतणार आहेत. तर भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांमध्ये राहुल गांधी हेच सामील होणार नाहीत.
राहुल गांधी यांनी मागील वर्षी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला प्रारंभ केला होता. 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून सुमारे 4 हजार किलोमीटरचा प्रवास केल्यावर राहुल गांधी यांची ही यात्रा 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये समाप्त झाली होती.
राहुल गांधी हे स्वत:च्या युरोप दौऱ्यादरम्यान 7 सप्टेंबर रोजी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये युरोपीय महासंघाच्या सदस्यांना भेटणार आहेत. अशाचप्रकारे द हेगमधील एका बैठकीत ते सहभागी होणार आहेत. मानवाधिकार विषयक युरोपीय संसदेच्या उपसमितीचे अध्यक्ष उडो बुलमॅन यांच्यासोबत राहुल गांधी हे चर्चा करणार आहेत.
8 सप्टेंबर राहुल गांधी हे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. 9 सप्टेंबर रोजी पॅरिसमध्ये फ्रान्सच्या लेबर युनियनच्या बैठकीत राहुल गांधी सामील होतील. 10 सप्टेंबर रोजी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे राहुल गांधी हे भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करणार आहेत. तेथील विदेशमंत्री, विरोधी पक्षनेते आणि माजी पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांची ते भेट घेणार आहेत. याचबरोबर नॉर्वेचे खासदार अन् उद्योजकांसोबत त्यांची चर्चा होणार आहे. राहुल गांधी हे 11 सप्टेंबर रोजी भारतात परतणार आहेत. जी-20 परिषद नवी दिल्ली येथे 9-10 सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे.









