चित्रपट चालू देणार नसल्याचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणातील निजामाबाद ग्रामीणचे काँग्रेस आमदार आर. भूपति रेड्डी यांनी अभिनेता अल्लू अर्जुनला धमकी दिली आहे. अल्लूने तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डीविरोधात कुठलीही टिप्पणी केली तर त्याचे चित्रपट राज्यात चालू देणार नाही. काँग्रेस कधीच चित्रपटसृष्टीच्या विरोधात राहिला नाही. काँग्रेस सरकारने हैदराबादमध्ये चित्रपट उद्योग स्थापन करण्यासाठी कलाकारांना भूखंड दिले आहेत. परंतु ‘पुष्पा’सारखे चित्रपट समाजासाठी उपयुक्त नाहीत, असा दावा रेड्डी यांनी केला आहे.
अल्लू अर्जुनने आमच्या मुख्यमंत्र्यांच्या विषयी काहीही बोलण्यापूर्वी खबरदारी घ्यावी. अल्लू हा आंध्रप्रदेशचा असून तो हैदराबादमध्ये राहण्यासाठी आला आहे. तेलंगणासाठी त्याचे काहीच योगदान नाही. अल्लू अर्जुनने स्वत:मध्ये सुधारणा केली नाही तर त्याचे चित्रपट आम्ही तेलंगणात चालू देणार नाही असे रेड्डी यांनी म्हटले.
4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा मुलगा जखमी झाला होता. त्या घटनेवरून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अल्लू अर्जुनवर टीका केली होती. अल्लू अर्जुनने चित्रपटगृहात विनाअनुमती चित्रपटाचे स्क्रीनिंग केले होते, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता.









