सरकार दर पंधरा दिवसाला एक आध्यादेश काढत असताना सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात आध्यादेश काढायला काय अडचण आहे असा सवाल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा म्हणून येत्या काळात जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना काँग्रेसचे आमदार उपस्थित राहणार नसल्याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. मराठा आंदोलनासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणाला पाठींबा दर्शविण्य़ासाठी ते आज काँग्रेसच्या आमदारांबरोबर दसरा चौकातील आंदोलनस्थऴी भेट दिली.
मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी कोल्हापूरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मराठा आंदोलनाच्या साखळी उपोषणाला पाठींबा दिला.
यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी काँग्रेस नेहमीच मागणी केली आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या काळात सार्वजनिक कार्यक्रमांना जिल्ह्यातील सहाही आमदार उपस्थित राहणार नाही. या आंदोलनाला चालना मिळाली पाहीजे ही आमची भुमिका आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असताना सरकार कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून फार काही समोर येत नाही. राज्य शासनाला दिलेली मुदत आता ओलांडून गेली आहे. त्यामुळे सरकार वेळकाढूपणा करत आहे.” असा आरोप त्यांनी केला.
आंदोलकांना पाठींबा दर्शविताना आमदार पी. एन. पाटील म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी जी भुमिका घ्यायची ठरवली आहे तीच भुमिका काँग्रेसची असेल. आरक्षणसाठी राज्य शासनावर दबाव टाकण्यासाठी आम्ही नेहमीच आंदोलकांच्या पाठीशी आहे.” असे मत व्यक्त केले.









