एसआयटीने चौकशीसाठी केले पाचारण
वृत्तसंस्था/ नूंह
हरियाणाच्या नूंहमध्ये 31 जुलै रोजी झालेल्या हिंसेवरून फिरोजपूर झिरका येथील काँग्रेस आमदार मामन खान यांना पोलिसांनी नोटीस बजावून 31 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. काँग्रेस आमदार मामन खान यांची बडकली चौक हिंसाप्रकरणी स्थापन एसआयटी चौकशी करणार आहे. मामन खान यांना नोटीस बजावण्यात आल्यावर हरियाणाचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप तसेच काँग्रेसकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी हिंसेसाठी मामन खान जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. एसआयटीकडून मामन खान यांची अनेक तासापर्यंत चौकशी केली जाऊ शकते. बडकली चौक येथे वाहने अन् दुकानांची जाळपोळ, तोडफोड, लूट इत्यादी घटना घडल्या होत्या. याप्रकरणी अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंसेवरून काँग्रेसने राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. तर भाजपने या हिंसेमागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. हत्येच्या प्रयत्नासह विविध गुन्हे नोंद असलेले काँग्रेस आमदार मामन खान हे या हिंसेमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.









