वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हरियाणाचे काँग्रेसचे आमदार मामन खान यांना हरियाणा पोलिसांनी गुरुग्राम येथे अटक केली आहे. धार्मिक दंगल भडकविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशिष्ट समुदायाच्या लोकांना भडकाविणे आणि त्यांना हिंसाचार करण्यास उद्युक्त करणे असेही आरोप त्यांच्यावर आहेत. हिंदूंनी काढलेल्या ब्रजमंडल यात्रेला त्यांनी लक्ष्य केले होते, असे हरियाणा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवासांपूर्वी हरियाणातल्या नूह येथे हिंदू-मुस्लीम हिंसा भडकली होती. मामन खान हे नूह जिल्ह्यातल्या झिर्का विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना 25 ऑगस्टला नोटीस पाठविण्यात आली होती. लोकांना भडकाविणे, प्रक्षोभक भाषण करणे, लोकांना हिंसाचाराला प्रवृत्त करणे आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांसमोर उपस्थित न होता त्यांनी आजारीपणाचे कारण पुढे केले. त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.









