► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी मंगळवार, 15 जुलै रोजी पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी ही बैठक होत असून त्यामध्ये मुख्य विरोधी पक्ष अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याविषयी चर्चा करणार आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर वरिष्ठ नेते या बैठकीत सहभागी होतील. काँग्रेस संसद अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’, पहलगाम दहशतवादी हल्ला, बिहारमधील मतदारयादीत सुधारणा आणि भारत-पाक मुद्द्यात हस्तक्षेप करण्याच्या ट्रम्प यांच्या विधानांवर चर्चेची मागणी करेल.
संसदेचे अधिवेशन 21 जुलैला सुरू होऊन जवळपास महिनाभर चालेल. महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा करता यावी म्हणून सरकारने अधिवेशनाचा कालावधी 12 ऑगस्टवरून 21 ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. यामध्ये अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला परवानगी देणारे विधेयक देखील समाविष्ट आहे. सरकारची जबाबदारी निश्चित करण्याची संधी म्हणून विरोधी पक्ष या अधिवेशनाकडे पाहत आहे.









