चन्नम्मा चौक येथे रास्तारोको : केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने मोर्चा काढून नोंदविला निषेध : तीव्र घोषणाबाजी
बेळगाव : भारतीय अन्न महामंडळाने कर्नाटक सरकारला 15 लाख मेट्रीक टन तांदूळ देण्याची तयारी दर्शविली होती. याबाबत पत्रही पाठविले. मात्र त्यानंतर अचानकपणे आम्ही तांदूळ देणार नाही, तांदळाची खुल्या बाजारात विक्री करणार असल्याचे कळले आहे. केंद्र सरकारने घातलेल्या दबावामुळे अन्न महामंडळाने हा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने मोर्चा काढून निषेध नोंदविला. राज्यातील गोरगरीब जनतेला 10 किलो मोफत तांदूळ देण्याची महत्त्वाकांक्षी अन्नभाग्य योजना लागू करण्यात आली होती. असे असताना केंद्र सरकारच्या आडमुट्या भूमिकेमुळे राज्यातील जनता अडचणीत आली आहे. पेंद्रातील सरकार गरिबांचे नसून केवळ अदानी, अंबानी यांचे असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आम्ही गरीब जनतेला मोफत तांदूळ देत असल्यामुळे भाजपला पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच भाजपने ही कुरघोडी केल्याचा आरोप करण्यात आला.
भाजपवर कडाडून टीका
केंद्र सरकार कितीही दबाव आणून देत, मात्र आम्ही राज्यातील जनतेला जाहीर केल्याप्रमाणे 10 किलो तांदूळ देऊ, असे आश्वासन काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी दिले. महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजपवर कडाडून टीका केली. कर्नाटक सरकार अडचणीत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. गरीब जनतेचे अन्न हिसकावून केंद्र सरकारला काय मिळणार आहे, असा आरोपही त्यांनी केला. कोठूनही आम्ही तांदूळ उपलब्ध करू. मात्र राज्यातील जनतेला आश्वासनाप्रमाणे मोफत तांदूळ देऊ. जुलैपासून अन्नभाग्य योजना अंमलात आणू, असा विश्वासही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोको करण्यात आला. महिलांनी येताना टोपल्यातून तांदूळ आणले होते. ते तांदूळ दाखवून केंद्र सरकारचा निषेध करताना दिसत होत्या. आमदार राजू सेठ यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कित्तूर चन्नम्मा चौकात निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









